शेवटच्या षटकांत फटकेबाजी
By admin | Published: December 18, 2014 10:15 PM2014-12-18T22:15:52+5:302014-12-19T00:25:30+5:30
अनेकांची दिवाळी कडू--खासदार अनू आगा यांनी सातारा तालुक्यातील शिवथर हे गाव दत्तक घेतले आहे.
जगदीश कोष्टी- सातारा लोकसभा, विधानसभा निवडणुका याच वर्षी झाल्या. त्यामुळे सुमारे नव्वद दिवसांची आचारसंहिता यावर्षी लागल्याने विकासकामे करताना जिल्हा परिषदेसमोर तांत्रिक अडचणी आल्या. मात्र, ‘संसद ग्राम’ योजनेअंतर्गत तब्बल तीन खासदारांनी जिल्ह्यातील गावे दत्तक घेतल्याने शेवटच्या काही षटकांमध्ये विकासकामांची फटकेबाजी करण्याची वेळ सातारा जिल्हा परिषदेवर आली आहे.
‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात.
सातारा जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)पदी टी. आर. गारळे असताना निर्मल ग्राम योजनेत राज्यात डंका पिटवला होता. राज्यातील अनेक गावांनी या योजनेत स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन नव-नवे उपक्रम राबवित राज्यात बक्षिसे मिळविली होती. त्याकाळी जिल्हा परिषदेने स्थापन केलेले ‘गुड मॉर्निंग’ पथक गावात गेल्याबरोबर अनेकांची पळापळ होत होती. या पथकाची अनेकांनी धास्तीच घेतली होती.
गेल्या काही वर्षांपासून मात्र या योजनेला खीळ बसल्याचे जाणवत होते. त्यानंतर केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील वीस टक्के गावांमध्ये अध्यापही स्वच्छतागृहे नसल्याचे समोर आले आहे. याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्येकाला एक-एक गाव दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अधिकारीही कामाला लागले आहेत.
याच वर्षभरात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध समित्यांच्या सभापतींच्या निवडी झाल्या. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवरून बरेच मानापमान तसेच राजकीय खेळी झाल्याचे सातारकरांना पाहायला मिळाले. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून तसेच आपल्याला सहकार्य करणारा जिल्हा परिषद गटांच्या बाबतीत बेरीज-वजाबाकीची गणितं करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या निवडी पार पाडल्या. त्यातूनच माणिकराव सोनवलकर यांच्या गळ्यात अध्यक्ष तर रवींद्र साळुंखे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली.
सातारा जिल्हा परिषदेने या वर्षभरात अनेक नावीण्यपूर्ण उपक्रम राबविल्याने सर्वत्र बोलबाला होता आहे. ‘निर्मल ग्राम’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नऊ कुटुंबे दत्तक घेतली आहेत.
अनेकांची दिवाळी कडू
जिल्हा परिषदेतील कामात सुसूत्रता यावी, प्रशासकीय अडचणी कमी व्हाव्यात म्हणून संगणकीकरण वाढले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आॅनलाईन खात्यात जमा होत आहेत. मात्र, आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांवर दिवाळी कडू साजरी करण्याची वेळ आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्य करत असलेल्या ९१ कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांत एक रुपयाही मानधन मिळाले नाही. तसेच कुष्टरोग नियंत्रण पथकातील कर्मचाऱ्यांचे काही महिन्यांचे पगार वेळेत झाले नाहीत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली होती.
उदयनराजे भोसले हे सातारचे खासदार आहेत. त्यांनी संसद ग्राम योजनेअंतर्गत सातारा तालुक्यातील कोंडवे गाव दत्तक घेतले. त्यांच्याबरोबर खासदार शरद पवार यांनी खटाव तालुक्यातील ऐनकूळ तर खासदार अनू आगा यांनी सातारा तालुक्यातील शिवथर हे गाव दत्तक घेतले आहे.