महाराष्ट्राचे वीरपुत्र सुभेदार विजय शिंदे पंचत्वात विलीन; लष्कराकडून मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 08:12 PM2022-05-29T20:12:21+5:302022-05-29T20:29:45+5:30

विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव शिंदे हेही लष्करात २२ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सुभेदार पदावरून निवृत्त झाले होते. तीन-चार वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले. वडील, मोठा भाऊ प्रमोद यांचा देशसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशसेवेत जायचंच, हे स्वप्न उराशी बाळगून विजय शिंदे यांनीही शिक्षणाचे धडे घेतले.

Last salute to Martyr Maharashtra's brave son Subhedar Vijay Shinde | महाराष्ट्राचे वीरपुत्र सुभेदार विजय शिंदे पंचत्वात विलीन; लष्कराकडून मानवंदना

महाराष्ट्राचे वीरपुत्र सुभेदार विजय शिंदे पंचत्वात विलीन; लष्कराकडून मानवंदना

googlenewsNext

पुसेगाव : लेह-लडाखमध्ये देशसेवा बजावताना अपघाती निधन झालेले महाराष्ट्राचे वीरपुत्र सुभेदार विजय सर्जेराव शिंदे (वय ४०) यांच्यावर रविवारी खटाव तालुक्यातील विसापूर येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘विजय शिंदे अमर रहे. ’च्या घोषणा देत हजारो नागरिकांनी विसापूरच्या या भूमिपुत्राला अखेरचा सलाम केला.

विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव शिंदे हेही लष्करात २२ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सुभेदार पदावरून निवृत्त झाले होते. तीन-चार वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले. वडील, मोठा भाऊ प्रमोद यांचा देशसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशसेवेत जायचंच, हे स्वप्न उराशी बाळगून विजय शिंदे यांनीही शिक्षणाचे धडे घेतले. विजय शिंदे हे वयाच्या १७ व्या वर्षी २२ मराठा लाईट इन्फंट्रीत लष्करी सेवेत रुजू झाले. ते सध्या लेह-लडाख येथे सुभेदार पदावर कार्यरत होते. २६ जवान परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उपसेक्टर हनिफच्या फॉरवर्डकडे जात असताना लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत पडले. या अपघातात सात सैनिकांना वीरमरण आले. त्यात सुभेदार विजय शिंदे यांचाही समावेश होता.

विजय शिंदे यांचे पार्थिव रविवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळगावी विसापूर येथे कुटुंबीय व नातेवाईकांना अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. त्यांचे पार्थिव दिसताक्षणी वीरपत्नी प्रिया, मुली दिया, रिया, वीरमाता अरुणा शिंदे, भाऊ प्रमोद व हणमंत शिंदे यांच्यासह कुटुंबियांनी आक्रोश केला. हा क्षण उपस्थितांचे हृदय पिळवटणारा होता. मुख्य रस्त्याच्या स्वागत कमानीपासून फुलांनी सजवलेल्या रथातून सुभेदार विजय शिंदे यांच्या अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. रथापुढे देशभक्तीपर गीते लावली होती. गावातील मुलींनी अंत्ययात्रा मार्गावर फुले टाकली होती.

अंत्ययात्रा मार्ग व चौकाचौकात ‘वीर जवान तुझे सलाम, विजय शिंदे अमर रहे...’ असे फलक लावले होते. या दरम्यान विजय शिंदे यांचे पार्थिव श्री वाघेश्वरी मंदिरालगतच्या चौकात स्टेजवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर कुंभारकी शिवारात होणाऱ्या अंत्यविधीच्या ठिकाणी रथातून पार्थिव नेण्यात आले.

यावेळी आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माजी पोलीस महानिरीक्षक भुजंगराव शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, तहसीलदार किरण जमदाडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन बाळासाहेब जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, मानजीराव घाडगे, बंडा गोडसे, संदीप मांडवे यांच्यासह सैन्य दलातील अधिकारी, जवानांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.

जिल्ह्याने एक वीर गमावला : पालकमंत्री
लेह लडाख येथे भारतमातेचे संरक्षण करीत असताना विसापूरचे सुपुत्र सुभेदार विजय शिंदे हे शहीद झाले. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. शिंदे कुटुंबासोबतच संपूर्ण जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहीद सुभेदार विजय शिंदे यांच्या दुःखात संपूर्ण सातारा जिल्हा सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी वाहिली.

देशाप्रती असणारे शहीद विजय शिंदे यांचे कार्य अमर राहील -
सातारा जिल्हा शूरवीरांचा व क्रांतिकारकांचा म्हणून ओळखला जातो. देशसेवेची परंपरा जोपासण्याचे काम विसापूर गावातील अनेक युवक करीत आहेत. लेह लडाख येथे सुभेदार विजय शिंदे हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. देशाप्रती असणारे शहीद विजय शिंदे यांचे कार्य अमर राहील.
- खासदार श्रीनिवास पाटील
 

Web Title: Last salute to Martyr Maharashtra's brave son Subhedar Vijay Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.