सापडलेले दहा तोळे सोने केले युवकाने परत, सर्वत्र कौतुक : अपघातानंतर हरवली होती बॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 04:16 PM2019-04-26T16:16:06+5:302019-04-26T16:18:19+5:30
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणुसकी लोप पावत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, सातारा तालुक्यातील नागेवाडीतील युवक याला अपवाद ठरला आहे.
सातारा : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणुसकी लोप पावत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, सातारा तालुक्यातील नागेवाडीतील युवक याला अपवाद ठरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नवी मुंबई येथे वास्तव्यास असणारे महमूद शेख हे दोन दिवसांपूर्वी कारने मुंबईहून साताऱ्यात येत होते. नागेवाडी फाट्यावर आल्यानंतर त्यांच्या कारला अपघात झाला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्यासोबत असलेली बॅग अज्ञाताने पळवून नेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी ही नागेवाडी फाट्यापासून काही अंतरावर महादेव नाटेकर (वय २४, रा. नागेवाडी, ता. सातारा) याला सापडली. या युवकाने बॅग उघडून पाहिली असता बॅगमध्ये दहा तोळे सोन्याचे दागिने, एटीएम, पॅनकार्ड आदी कागदपत्रे होती. त्या बॅगेत असलेला मोबाईल बंद होता. घरी जाऊन त्याने तो मोबाईल सुरू केला. त्यानंतर त्या मोबाईलवर आलेल्या फोनवरून त्याने माय मॉम या नावाने सेव्ह असलेल्या फोन नंबरवर कॉल केला.
त्यावेळी महमूद शेख याच्या आईने माझ्या मुलाचा साताऱ्याजवळ अपघात झाला असून, त्याची बॅग हरवली आहे. त्यावेळी महादेव नाटेकर याने तुम्ही काळजी करू नका, तुमची बॅग माझ्याजवळ आहे. बॅगमधील सर्व दागिनेही सुरक्षित आहेत, असे सांगितले. तेव्हा कुठे महमूद शेख यांच्या आईचा जीव भांड्यात पडला.
महादेव नाटेकरने बॅग सापडल्याची माहिती पोलीस पाटील अविनाश भोसले यांना सांगितली. त्यानंतर ते नाटेकरसह सातारा तालुका पोलीस ठाण्यात आले. हवालदार राजू मुलाणी, हवालदार आक्रम मेटकरी यांच्या समक्ष ओळख पटल्यानंतर महमूद शेख याला दागिने असलेली बॅग परत केली. यावेळी सर्व पोलिसांनी महादेव नाटेकरचे कौतुक केले. महादेवच्या रुपाने आजही समाजात माणुसकी टिकून असल्याचे पोलिसांनी बोलून दाखविले.