तीस वर्षांत तब्बल साडेचार कोटी ग्रंथांची छपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:15 PM2018-07-22T23:15:25+5:302018-07-22T23:15:35+5:30
शंकर पोळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपर्डे हवेली : संतांचे वाड्मय घरोघरी पोहोचावे आणि त्या वाड्मयाचा लाभ सर्वांना मिळावा, या हेतूने संत वाड्मय प्रसारक मंडळ गेल्या तीन दशकांपासून काम करत आहे. त्याच्या छपाईचे काम कोपर्डे हवेली येथील वैष्णव सदनमध्ये सुरू असते. तयार होत असलेल्या ग्रंथावर प्रकाशन म्हणून कोपर्डे हवेली गावाचा पत्ता असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यात ग्रंथांबरोबर गावाचे नाव पोहोचले आहे.
व्यसनमुक्ती संघाचे संस्थापक अध्यक्ष बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपर्डे हवेली येथे वैष्णव सदनची निर्मिती झाली. १९८७ मध्ये वारकरी प्रसारक मंडळ यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. कोपर्डे हवेली येथील या वैष्णव सदनमध्ये गेल्या तीस वर्षांत लहान-मोठे असे सुमारे ४ कोटी ५० लाख ग्रंथांची छपाई करून ना नफा ना तोटा या तत्त्वावर त्याची विक्री केली जात आहे. वर्षाला सुमारे १८ लाख वाड्मयीन ग्रंथ तयार करून त्याची विक्री होते.
छपाई केलेले संत वाड्मय आळंदी, पंढरपूर, पुणे, देहू आणि वैष्णव सदन येथे विक्रीसाठी ठेवले जाते. तसेच याठिकाणी गायन, तबला वादन, कीर्तन आदींसाठी मार्गदर्शन केले जात होते; पण छपाईच्या व्यापामुळे हे मार्गदर्शन आता कºहाड येथील मठामध्ये सुरू आहे. संत वाड्मय छपाईमुळे गरजू लोकांना रोजगार मिळाला आहे. वैष्णव सदनमधील सर्व जबाबदारी हे सुभाष पाटील पाहत असतात. सकाळपासून सायंकाळपर्यंत त्यांचे काम सुरू असते. वारकरी संप्रदाय हा जगभर पसरल्याने वाचकांची संख्या जगभर आहे.
भजनी मालिका प्रकाशित
नामदेव अप्पा शामगावकर यांची प्रसिद्ध झालेली नित्यनियम भजनी मालिका याच ठिकाणाहून प्रकाशित केली जाते. अनेक वारकरी भजनी मालिकेचा दैनंदिन वापर करतात.