गेल्या वर्षी ६८ टँकर.. ..यंदा मात्र केवळ आठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 11:58 PM2018-04-25T23:58:52+5:302018-04-25T23:58:52+5:30

Last year 68 tankers .. ..yesterday only eight! | गेल्या वर्षी ६८ टँकर.. ..यंदा मात्र केवळ आठ !

गेल्या वर्षी ६८ टँकर.. ..यंदा मात्र केवळ आठ !

Next

दत्ता यादव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : उन्हाळ्याची चाहूल लागताच दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात टँकरची मागणी होत होती. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये जिल्ह्यात तब्बल ६८ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.
मात्र, यंदा ही परिस्थिती बदलली असून, जिल्ह्यात केवळ आठ ठिकाणी टँकर सुरू करण्यात आले आहेत. गत तीन वर्षांपेक्षा टंचाईची तीव्रता अत्यंत कमी झाली असून, जलयुक्त शिवार आणि पुरेसा पाऊस झाल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्याचा हा परिणाम असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात दरवर्षी नागरिकांना भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत होते. एवढेच नव्हे तर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून टँकरची मागणी होत होती. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे दीडशेहून अधिक मागणी अर्ज येत होते. विशेषत: माण, खटाव, खंडाळा आणि कोरेगाव तालुका दुष्काळ प्रवणक्षेत्र म्हणून ओळखले जात होते. मात्र, याच तालुक्यांनी केवळ एका वर्षात आपली दुष्काळाची ओळख पुसट करून टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही ठरला.
जलयुक्त शिवार योजना आणि वॉटर कप स्पर्धेत या दुष्काळी पट्ट्यातील गावांनी हिरिरीने सहभाग घेतला. गावच्या आजूबाजूने बंधारे बांधून पाणी अडविले. त्यामुळे साहजिकच पाणीसाठ्यात वाढ झाली. परिणामी गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी संपला असला तरी गावकऱ्यांची मेहनत आणि जिद्द दुष्काळी भाग म्हणून
असलेली ओळख पुसण्यास कारणीभूत ठरली.
ऐन एप्रिल महिन्यातही यंदा कोरेगाव आणि खंडाळा तालुक्यामध्ये अद्यापही टँकरची मागणी झाली नाही. मात्र, खटाव आणि माण तालुक्यामध्ये मागणी होऊ लागली आहे.
खटाव तालुक्यातील आवळेपठार (गारवडी) येथे तीन दिवसांतून एकदा एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात
येत आहे. माण तालुक्यामधील सात गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आले. विरळी, पुकळेवाडी, पाचवड, वारूगड, मोगराळे, कुकुडवाड, जाधववाडी या गावांचा त्यामध्ये समावेश आहे.
एप्रिल महिना संपत आला तरी जिल्ह्यात केवळ आठ टँकर सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरठवा विभागातर्फे अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याची कामेही करण्यात आली आहेत. तसेच गेल्या वर्षी पावसाचे प्रमाणही चांगले
होते. त्यामुळे साहजिकच पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे दृष्काळाच्या झळा नागरिकांना यंदा कमी सोसायला लागतायंत.

पाच वर्षांपूर्वी म्हणे दोनशे टँकर...
माण आणि खटाव तालुक्यांची गेल्या पाच वर्षांपूर्वी भीषण परिस्थिती होती. प्रचंड दुष्काळ आणि पाण्याची टंचाई यामुळे नागरिक अक्षरश: हैराण होत होते. या दोन तालुक्यांत म्हणे त्यावेळी दोनशेहून अधिक टँकर सुरू होते. मात्र, कालांतराने या तालुक्यांमध्ये बदल होत गेला. जिल्ह्यातील इतर नऊ तालुक्यांमध्ये पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे नागरिकांनी कधी टँकरची मागणी केली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व लक्ष माण, खटाव या दोन तालुक्यांत केंद्रीत केले होते.

Web Title: Last year 68 tankers .. ..yesterday only eight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.