गतवर्षी आरतीचे ताट व फुले, यावर्षी नाक मुरडणे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:26+5:302021-06-10T04:26:26+5:30
वडूज : जगावर कोसळलेल्या कोरोना महामारी संकटामुळे मानवाचे राहणीमान पूर्णतः विस्कळीत झाले आहे. गतवर्षी कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन घरी ...
वडूज : जगावर कोसळलेल्या कोरोना महामारी संकटामुळे मानवाचे राहणीमान पूर्णतः विस्कळीत झाले आहे. गतवर्षी कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन घरी परतल्यानंतर आरतीचे ताट व फुलांचा वर्षाव होत असे, मात्र सघ्या बाधित रुण बरा होऊन घरी परतल्यानंतर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. प्रसंगी नाक मुरडणेही निदर्शनास येऊ लागले आहे.
सातारा जिल्हा रेड झोनमध्ये असून, त्यामध्ये खटाव तालुका हायरिस्कमध्ये मोडत आहे. तालुक्यातील १३३ गावांपैकी ५० प्रमुख गावे प्रशासनाने प्रतिबंधित म्हणून जाहीर केली आहेत. खटाव तालुक्यात १५,८३१ बाधित रुग्ण होते. यापैकी १४,०३२ बाधित रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. यामध्ये आजअखेर ४२० जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. १३७९ बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, ९७७ बाधित रुग्ण शाळा व होम आयसोलेशनमध्ये दाखल आहेत. १६३ बाधित रुग्ण कोरोना केअर सेंटर, १८२ बाधित रुग्ण कोविड सेंटरला व ५७ बाधित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आरोग्य विभाग व महसूल प्रशासन खटाव तालुक्यात प्रामाणिकपणे कार्यरत असून, त्यांच्यासोबत पंचायत समिती विभागदेखील कार्यरत आहे. यामध्ये शिक्षण विभागदेखील सध्या फ्रंटलाईनवर्कर म्हणून कार्यरत आहेत.
पंचायत समिती शिक्षण विभागाकडून प्राथमिक व माध्यमिक आणि ज्युनिअर कॉलेजचे १२०६ शिक्षक या काळात जिवाची बाजी लावत आहेत. यामध्ये २८० शिक्षक प्रतिबंधित क्षेत्रामध्ये, शाळा व होम आयसोलेशनमध्ये ३२० शिक्षक, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण ऑनलाईन रजिस्टेशनसाठी ३९० शिक्षक, तर ४८ शिक्षक रुग्णालयात कार्यरत आहेत. पंचायत समिती वडूज कार्यालयात कोरोना सेंटर व कोविड सेंटर आणि शाळा आयसोलेशनमध्ये रिक्त बेड माहिती देण्यासाठी ७ शिक्षक रेमडेसिविर माहिती देण्यासाठी २ शिक्षक चोवीस तास कार्यरत आहे,. तर उर्वरित १५९ शिक्षक कोरोनाबाधित संपर्कातील बाधित रुग्णांची माहिती गोळा करण्यासाठी आशा स्वयंसेविका व अगंणवाडी सेविका यांच्यासोबत कार्यरत आहेत.
चौकट..
कोरोनावर मात केलेल्या लोकांमध्ये समज-गैरसमज
जिल्हा प्रशासनाच्या बरोबरीने तालुका प्रशासनही सतर्क झालेले आहे. उपचार घेऊन घरी परतलेल्या नागरिकांना घरातील व घराशेजारील लोक वेगळ्याच नजरेने पाहत आहेत. त्यामुळे अगोदरच खचलेल्या त्या बाधित रुग्णाला बरे होऊन आल्यानंतर आपण अपराधी असल्यासारखे वाटत आहे. यापूर्वी सोशल मीडियावर विविध जणांच्या स्टेटसवर बरे होऊन आल्यानंतर आरतीचे ताट व फुलांचा वर्षाव पाहिलेला होता. आता मात्र आपण बरे होऊन आल्यानंतर कोणालाच समाधान झाले की नाही, याच विवंचनेत कोरोनावर मात केलेल्या लोकांच्यात समज-गैरसमज पसरत आहेत.