पुढे सपाट अन् मागे मात्र खडखडाट
By Admin | Published: May 26, 2015 10:50 PM2015-05-26T22:50:40+5:302015-05-27T01:00:42+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे केले अर्ध्याच रस्त्याचे काम; अर्धा जैसे थे
सचिन काकडे - सातारा -: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन दिवसांपूर्वीच जिल्हा दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील विविध योजनांना भेट देऊन पाहणी केली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातही रविवारी (दि. २४) मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी बांधकाम विभागाने नियोजन भवानापर्यंत अर्धा रस्ता डांबरीकरण करून चकाचक केला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयामागे असणाऱ्या रस्त्याची अवस्था जैसे थे असून पुढे सपाट अन् मागे
मात्र खडखडाट असे चित्र सध्या या ठिकाणी पहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा दूसरा जिल्हा दौरा असला तरी ते पहिल्यांदाच साताऱ्यात आले होते. जिल्ह्यात जलयुक्त शिवार, पाणलोट अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची पाहणी केल्यानंतर
फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. २४) सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात धरणग्रस्त व जलयुक्त शिवार अभियानाबात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीपूर्वी बांधकाम विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीपासून ते नियोजन भवनापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करून हा रस्ता चकाचक केला. नियोजनानुसार मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक पार पडली. मात्र, अर्धवट डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे काय? जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारती मागील रस्ता खड्डेमय झाला असून त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याचा जरी वापर जरी कमी प्रमाणात होत असला तरी याठिकाणी वाहनांच्या पार्किंगसाठी प्रशस्त जागा उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी कार्यालय शासनाचा अविभाज्य घटक आहे. या कायालयाशी दररोज विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचा संबंध येतो. याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे प्रशासनाने ‘पुढे पाठ, मागे सपाट’ असे न करता अर्धवट करण्यात आलेल्या या रस्त्याचे
काम पूर्ण करणे गरजेचे आहे.
आमच्याकडे दुर्लक्ष का?
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अवती-भोवती अनेक शासकीय विभाग कार्यरत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांचे आंगण डांबरीकरणाने चकाचक करण्यात आले. याचा आनंद केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातील समोरच्या विभागालाच झाला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला असलेले विविध विभाग नाखूश असल्याचे बोलले जात आहे. पावसाळा अगदी तोंडावर आला असताना इतर विभागांजवळील रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे होते. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आमच्याकडेच शासनाने दुर्लक्ष का केले? असा उद्विग्न सवाल कर्मचारी खासगीत करीत आहे.