माणच्या सभापतीपदी रासपच्या लतिका वीरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:38 AM2021-05-26T04:38:41+5:302021-05-26T04:38:41+5:30

दहिवडी : माण पंचायत समितीच्या सभापतीपदी रासपच्या लतिका वीरकर यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सर्वच नेत्यांनी पाठिंबा ...

Latika Virkar of RSP as the Speaker of Man | माणच्या सभापतीपदी रासपच्या लतिका वीरकर

माणच्या सभापतीपदी रासपच्या लतिका वीरकर

googlenewsNext

दहिवडी : माण पंचायत समितीच्या सभापतीपदी रासपच्या लतिका वीरकर यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सर्वच नेत्यांनी पाठिंबा दिल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग सुखकर झाला. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी हे पीठासन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी निवडणूक प्रक्रिया सांभाळली.

सभापती कविता जगदाळे यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाल्याने झालेल्या रिक्त जागी उपसभापती तानाजी कट्टे यांनी काम पाहिले. प्रभारी सभापती म्हणून दोन महिने तानाजी कट्टे यांना संधी मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंगळवारी सकाळी अकरा वाजता नवीन सभापती निवडीसाठी कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार सभापतीपदासाठी रासपच्या उमेदवार लतिका वीरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना तानाजी काटकर यांनी सूचक म्हणून अनुमोदन दिले. साडेअकरा वाजता छाननी झाली. विरोधी गटाचे शेखर गोरे समर्थक विजयकुमार मगर गैरहजर राहिल्याने विरोधी गटाला उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.

राष्ट्रवादी, रासप युती या गटाकडे तीन सदस्य आहेत. आमदार जयकुमार गोरे गटाकडे तीन सदस्य आहेत. अनिल देसाई गटाचे एक व शेखर गोरे गटाचे नितीन राजगे हे सदस्य फुटून या गटात सामील झाले आहेत. असे आठ सदस्य एका बाजूस तर दुसऱ्या बाजूस शेखर गोरे गटाकडे दोन सदस्य आहेत. सद्यस्थितीत आठ विरुद्ध दोन असे बलाबल होते. ऐन निवडणुकीत शेखर गटाचे विजयकुमार मगर हे गैरहजर राहिले. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. साहजिकच लतिका वीरकर या बिनविरोध विजयी झाल्या.

रासप नेते बबन वीरकर यांनी आठ सदस्य एकत्र आणल्याने त्यांच्या पत्नी लतिका वीरकर यांना सभापतीपद मिळाले. अविश्वास ठराव दाखल करण्यापासून हे सर्व सदस्य एकसंघ होते. लतिका वीरकर यांच्या बाजूने प्रभारी सभापती तानाजी कट्टे-पाटील, माजी सभापती रमेश पाटोळे, नितीन राजगे, तानाजी काटकर, अपर्णा भोसले व चंद्रभागा आटपाडकर, रंजना जगदाळे या सदस्यांनी सहभाग नोंदवला. तर विरोधी गटाच्या कविता जगदाळे यांना त्यांचे सहकारी विजयकुमार मगर गैरहजर राहिल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यावर विजयकुमार मगर उपस्थित झाले.

लतिका वीरकर यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री महादेव जानकर, आमदार जयकुमार गोरे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, डॉ. संदीप पोळ, अनिल देसाई, मनोज पोळ, श्रीराम पाटील, मामूशेठ वीरकर, वैशाली वीरकर, लालासाहेब ढवाण यांच्यासह आदींनी कौतुक केले.

चौकट

माण पंचायत समितीमध्ये रासपच्या लतिका वीरकर या एकमेव सदस्य होत्या. अविश्वासाच्या वेळी सर्व सदस्यांना एकत्र करून एकसंध ठेवण्याची किमया बबन वीरकर यांनी केली. त्यामुळे पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच रासपचा झेंडा फडकला. सभापतीपद खुले असतानाही धनगर समाजाच्या वीरकर यांच्या सोबत आठ सदस्य राहिल्याने त्यांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणामुळे शक्य झाले .

कोट

रासपची मी एकमेव सदस्या होते. परंतु, सर्वच सदस्यांनी त्यांच्या नेत्यांनी मला सहकार्य केले. त्यामुळे सभापती झाले. सध्या कोरोनाची परिस्थिती खूप गंभीर आहे. अनेक आव्हाने आहेत तरीही मिळालेल्या पदाचा उपयोग जास्तीत जास्त सामान्यांच्या कामासाठी केला जाईल.

- लतिका वीरकर,

सभापती

फोटो २५दहिवडी-सभापती

माण पंचायत समितीच्या सभापतीपदी लतिका वीरकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे सदस्य व रासपचे पदाधिकारी उपस्थित होते. (छाया : नवनाथ जगदाळे)

Web Title: Latika Virkar of RSP as the Speaker of Man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.