लसीकरणाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:34 AM2021-01-17T04:34:52+5:302021-01-17T04:34:52+5:30

जिल्ह्यात शनिवारी नऊ ठिकाणी जवळपास शंभर आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. सकाळी लस दिल्यानंतर सायंकाळपर्यंत कोणती लक्षणे ...

Launch of vaccination | लसीकरणाचा शुभारंभ

लसीकरणाचा शुभारंभ

Next

जिल्ह्यात शनिवारी नऊ ठिकाणी जवळपास शंभर आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. सकाळी लस दिल्यानंतर सायंकाळपर्यंत कोणती लक्षणे आढळून आली का, यावरही जिल्हा प्रशासनाने बारकाईने लक्ष केंद्रित केले. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी लस दिलेल्या बऱ्याच जणांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले.

एकाच दिवसात शंभर जणांना लस

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना संसर्गामुळे राज्याचे अर्थचक्र थांबले. अनेकांचे प्राण गेले. सर्वांनाचा याचा त्रास झाला. गेले अनेक महिने लस येण्याची वाट पाहण्यात गेले. अखेर तो दिवस शनिवारी उजाडला अन् सातारकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ उत्साहाच्या वातावरणात जिल्हा शासकीय रुग्णालयासह नऊ ठिकाणी पार पडला.

‘सिव्हिल’मधील क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी बाळासाहेब खरमाटे यांना पहिली कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष माधवी कदम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी आरोग्य संस्था अंतर्गत कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभाग, सैन्य दल, हवाई दल व तिसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ही लस जिल्ह्यातील ९ ठिकाणी देण्यात येणार असून प्रत्येक दिवशी शंभर जणांना लस देण्यात येणार आहे. लस घेतल्यानंतर ३० मिनिटे निरीक्षणही करण्यात येणार आहे. लसी दिल्यानंतर आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.

लस टोचण्यापूर्वी एकाही आरोग्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर ताणाव दिसत नव्हता. सर्वच जण अगदी आनंदित होते. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही त्यांच्याकडे पाहून दिलासा मिळत होता. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यामुळे सध्या उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णही भारावून गेले आहेत. काेरोनातून आपण सहीसलाम आता मुक्त होऊ, अशी दृढ इच्छा बाधितांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

‘सिव्हिल’मधील क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी बाळासाहेब खरमाटे यांना लसीकरणाचा पहिला मान मिळाला. त्यांनीही नाव नोंद केले होते. शुभारंभ करताना ते शेजारीच उभे होते. अचानक त्यांना या तुम्हाला पहिली लस देऊ, असे सांगताच त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आपण पहिले मानकरी ठरलो, याचा त्यांना आनंद झाला.

ते म्हणाले, लस दिल्यानंतर मला कसलाही त्रास जाणवला नाही, आता लस घेतल्यामुळे कोरोनामुक्तीच्या कामासाठी आणखीन जोमाने काम करू. ज्या वेळी सर्वसामान्य नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे तेव्हा त्यांनी आपल्या स्वत:च्या प्रकृतीसाठी ही लस आवर्जून घ्यावी, असे आवानही बाळासाहेब खरमाटे यांनी या वेळी केले.

जिल्ह्यासाठी किती लसींचे डोस तयार आहेत?

जिल्ह्यात २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीसाठी नोंद केली असून, ३० हजार डोस जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहेत. रोज शंभर जणांना लस देण्यात येणार आहे. शेवटच्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवानही करण्यात आले आहे.

लसीकरणानंतर दोघांना नाॅर्मल रिॲक्शन :

जिल्ह्यात पहिल्या दिवशी शंभर जणांना लस देण्यात आली. कऱ्हाड आणि कोरेगाव या ठिकाणी दोघांना साैम्य रिॲक्शन आली. त्यांना चक्कर आल्यासारखे झाले. त्यानंतर काही वेळात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

कोरोनाच्या वैश्विक संकटात आम्ही राष्ट्रीय कर्तव्य समजून सेवाभावाने काम करत होतो. लसीकरण मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रथम लसीकरणासाठी निवड झाली. सर्वांना महत्त्व व गरज पटवून दिली. या लसीचा कोणताही त्रास होत नाही.

- डॉ. सुभाष चव्हाण

जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

ज्यांना रिॲक्शन झाली त्यांचा आणि लसीचा काही एक संबंध नसल्याचा खुलासा जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी केला आहे. कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवानही त्यांनी केले आहे.

लसीकरण मोहिमेत कोरोना योद्धे म्हणून दिलेल्या प्राधान्यामुळे अभिमान वाटतो. सुरुवातीला धाकधूक होती, पण लस घेतल्यानंतर कसलाच त्रास जाणवत नाही. लस घेतल्यावर मोबाइलवर धन्यवाद व्यक्त करणारा मेसेज आला.

- डाॅ. अनिरुद्ध आठल्ये,

जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा

लस दिल्यानंतर आम्हाला कोणताही त्रास झाला नाही. आजपर्यंत आम्ही रुग्णांची सेवा केली आणि पुढेही करत राहू. आज लस उपलब्ध झाल्यामुळे आम्ही आणखी जोमाने काम करू. या लसीचा कोणताही वेगळा परिणाम होत नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

- डाॅ. योजना तराळ,

वैद्यकीय अधिकारी, बावधन

जिल्ह्यात सर्वांनाच लस मिळणार आहे. लस टोचल्यानंतर फारसे वेगळे जाणवले नाही. कुठलाही त्रास नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीही ही लस घेणे गरजेचे आहे. पहिल्या दिवशीच आम्हाला लस टोचण्यात आल्यामुळे आम्ही आनंदी आहोत.

- सुरेंद्र शिर्के,

आरोग्यसेवक, बावधन, वाई

Web Title: Launch of vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.