अलर्ट! कुलिंग चार्जेसच्या नावावर ग्राहकांची लूट; छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणं गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 10:59 AM2022-04-07T10:59:49+5:302022-04-07T11:23:06+5:30
ग्राहकांच्या गरजेचा गैरफादा घेऊन व्यावसायिकांची ही मनमानी वर्षानुवर्षे सुरू आहे.
प्रगती जाधव-पाटील
सातारा - उन्हाळा सुरू झाला की तहानलेले अनेक जीव तृष्णा भागविण्यासाठी शीतपेयांची खरेदी करतात. शीतपेयांच्या वेष्ठनांवर असलेल्या किंमतीपेक्षा तीन ते पाच रूपये अधिक घेण्याचा सपाटा व्यावसायिकांना लावला आहे. कुलिंग चार्जेस लावल्यामुळे हे दर वाढीव असल्याचं गोजिरवाणं कारण व्यावसायिक पुढे करतात. मात्र, छापील किंमतीपेक्षा जास्त दराने कोणत्याही वस्तुची विक्री करणं हा दंडनीय गुन्हा आहे.
ग्राहकांच्या गरजेचा गैरफादा घेऊन व्यावसायिकांची ही मनमानी वर्षानुवर्षे सुरू आहे. पाच रूपयांसाठी कुठं कोणाशी वाद घालायचा या मानसिकेतून या तक्रारी करायला कोणीही पुढे येत नाही. याची जबाबदारी असणारा वजन मापे विभागही तक्रारदाराच्या प्रतिक्षेत असतो. त्यामुळे दुकानदारांचे चांगलेच फावले आहे. सर्रास सर्वत्र सुरू असलेल्या या प्रकारावर आळा घालण्यासाठी वजन मापे विभागाने डमी ग्राहक पाठवून याचा पर्दाफाश करावा, अशी ग्राहकांची इच्छा आहे. एकाद्या दुसºया दुकानावर अशी कारवाई झाली तरीही अन्य ठिकाणी याचा परिणाम होईल असा कयास ग्राहक व्यक्त करत आहेत.
वाढीव पाच रूपये कमवून देतात १० हजार रूपये
उन्हाळ्याच्या दिवसांत अगदी छोट्यातील छोट्या दुकानांमध्येही शीतपेय आणि थंड पाण्याच्या बाटल्या घेण्याचा धंदा हजारांमध्ये असतो. दिवसभरांत ६० ते ७० शीतपेयांच्या बाटल्या जाण्याचे प्रमाण आहे. प्रत्येक बाटलीमागे ३ ते ५ रूपये जादा आकारले तरीही एका दुकानात सुमारे ३५० रूपये जादा दिले जातात. याचा महिन्याचा हिशेब केला तर सुमारे १० हजार रूपयांचा अतिरिक्त कमाई या व्यावसायिकांची होते. पाच रूपयांसाठी कुठं भांडत बसा असा विचार करून सामान्य याची तक्रार करत नाही परिणामी जादा पैसे घेणाºयांचे धाडस मात्र चांगलेच वाढले आहे.
अशी टाळता येईल फसवणूक
शीतपेय तयार करणाऱ्या कंपन्यांनी ‘हे पेय थंड स्वरूपातच विक्रीसाठी ठेवावे’ अशी सुचना ठळकपणे लिहिली आहे. त्यामुळे दुकानदार जेव्हा जादा पैसे मागेल तेव्हा त्याला ही सुचना दाखवावी. हे बघूनही त्यांनी छापील किंमतीवर दिले नाही तर संबंधितांकडून त्याची पावती घ्यावी आणि त्याच्या विरोधात ग्राहक न्यायालयात दाद मागावी.
दुकानदारांची बनवाबनवी
१. कंपनीतून बाटल्या अशाच कोमट येतात. त्यामुळे या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात, परिणामी वीजेचे बिल जास्तीचे भरावे लागते.
२. कुलिंग चार्जेस द्यायचे नसतील तर कोमट बाटल्या घेऊन जावा
प्रत्यक्ष स्थिती ही
१. कुठल्याही पदार्थाचा दर ठरवताना त्याचे उत्पादन मुल्य काढले जाते. त्यानंतर त्याच्या पॅकिंगसह ते ग्राहकापर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास केला जातो. सुपर स्टॉकिस्टपासून अगदी छोट्या दुकानारांना परवडेल याचा सारासार विचार करून किंमत लावली जाते. त्यामुळे शीतपेयांच्या विक्रीतून होणाºया फायद्यातच वीजेच्या बिलाचाही समावेश असतो.
२. ‘टू बी सर्व्हड चिल्ड’ हे प्रत्येक शीतपेयावर लिहिलेले असते. त्यामुळे त्याची विक्री करताना ते थंडच असले पाहिजे हे कंपनीने अधोरेखित केले आहे.
छापील किंमतीपेक्षा जास्त दर आकारणं हा गुन्हा आहे. असे कोणी करत असेल तर संबंधितांकडून दुकानाचे नाव असलेल्या पावतीपुस्तकावर पदार्थ घेतलेल्याचे नाव, आकारलेले शुल्क आणि दिनांक यांचा उल्लेक असलेली पावती घ्यावी. त्यानंतर याची तक्रार वजन मापे विभागाकडे करण्यात यावी. त्यांनी दखल घेतली नाही तर ग्राहक न्यायालयात याची दाद मागता येते.
- अॅड. धीरज घाडगे, सातारा