कायदा तोडणारे घेणार हातात कायदा

By Admin | Published: February 8, 2016 10:50 PM2016-02-08T22:50:40+5:302016-02-08T23:45:42+5:30

बसस्थानक परिसर : मारहाणीच्या घटनेनंतर हॉकर्स संघटना आक्रमक; गावगुंडांना जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार --आॅन दि स्पॉट...

Laws in the hands of law breakers | कायदा तोडणारे घेणार हातात कायदा

कायदा तोडणारे घेणार हातात कायदा

googlenewsNext

प्रदीप यादव -- सातारा  सातारा मध्यवर्ती बसस्थानक ते पोवई नाका रस्त्यावर बसणाऱ्या हॉकर्सना मारहाण करत वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने रविवारी सायंकाळी दहशत निर्माण केली. या मारहाणीत चार हॉकर्स जखमी झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी हॉकर्स संघटनेने मारहाण करणाऱ्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, यापुढे एकाही हॉकर्सवर अन्याय झाला तर प्रसंगी कायदा हातात घेऊ, असा इशारा संघटनेचे शहर अध्यक्ष संजय पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.दरम्यान, रस्त्याच्या विस्तारवाढीत अडथळा ठरत असलेली दुकाने हटविण्याबाबत बांधकाम विभागाने दोन दिवसांपूर्वीच हॉकर्सना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, काहीही झाले तरी फूटपाथवरच बसून व्यवसाय करणार, अशी भूमिकाही संघटनेने घेतल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळे कायदा मोडणारेच कायदा हातात घेण्याची भाषा करत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.बांधकाम विभागाने गेल्या वर्षीही अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्त्याकडेची दुकाने हटविली होती. मात्र, पुन्हा काही दिवसांतच दुकानदारांनी आपली दुकाने रस्त्याकडेला थाटली. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी बांधकाम विभागाने हॉकर्सना नोटिसा बजावून दुकाने हटविण्याच्या सूचना केल्या आहेत.


प्रशासनाला पूर्ण सहकार्य, पण...
स्वच्छ, सुंदर साताऱ्याला आमचे पूर्ण सहकार्य आहे. साताऱ्यात चांगले रस्ते असावेत असे आम्हालाही वाटते, आम्हीही सातारकरच आहोत. परंतु बांधकाम विभागाने आमची दुकाने हटविली की पुन्हा दुसरे व्यावसायिक त्या जागेवर दुकाने थाटतात. गेल्या वर्षी तोच प्रकार झाला. प्रशासनाने कारवाई करताना सर्वांना समान न्याय द्यावा, त्यासाठी संघटनेचे पूर्ण सहकार्य राहील, असे संजय पवार म्हणाले.


दादागिरीचा त्रास नेहमीचाच
आम्ही रस्त्यावर व्यवसाय करतो. त्याबद्दल नगरपालिकेकडे कर भरतो. रस्त्यावरून जाणारे अनेक ग्राहक दुकानात खरेदीसाठी येतात. कुणी पूर्ण पैसे देतो तर कुणी कमी पैशात वस्तू देण्याची मागणी करतो. कुणी दादागिरीनं वस्तू फुकटात घेऊन जातो. कुणी दारू पिऊन धमकावतो. पण कधी तरी घडणाऱ्या या गोष्टींडे दुर्लक्ष करीत आम्ही व्यवसाय करत असतो. मात्र, मारामारी करून हप्ता मागण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडला असून त्यामुळे दुकाने सोडून जाण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे हॉकर्स म्हणाले.

परप्रांतीय ‘टार्गेट’
सातारा शहरात असणाऱ्या हॉकर्समध्ये परप्रांतीयदेखील आहेत. गेल्या वीस वर्षांपासून हे व्यावसायिक रस्त्याकडेला बेल्ट, घड्याळ, कपडे विक्रीचा व्यवसायक करत आहेत. रविवारी घडलेल्या मारामारीच्या घटनेत परप्रांतीयांनाच ‘टार्गेट’ केल्याचे हॉकर्सनी सांगितले. स्थानिकांपेक्षा परप्रातीयांनाच नेहमी अशा त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे काही हॉकर्सनी सांगितले.

आम्हालाच नोटिसा का?
बांधकाम विभागाने गेल्या वर्षी दुकाने हटविली होती. मात्र हॉकर्सनी पुन्हा रस्त्याकडेला दुकाने थाटली. आता पुन्हा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रत्येक वेळेला आम्हालाच का नोटिसा बजावल्या जात आहेत? रस्त्याकडेला उभ्या राहत असलेल्या एका मोठ्या बिल्डिंगसाठी आम्हाला टार्गेट केले जात असल्याचे पवार संजय पवार म्हणाले. समोरच्या बाजूला बांधकाम विभागाने अजून हातही लावला नाही. मात्र, आम्हाला नोटिसा काढून दुकाने हटविण्यास सांगितले आहे.


फूटपाथवरच बसणार!
पुणे, कोल्हापूरसारख्या शहरांमध्येही हॉकर्स फूटपाथवरच व्यवसाय करत आहेत. प्रशासनानं आम्हाला असं एखादं शहर दाखवून द्यावं जिथं फूटपाथवर व्यावसायिक बसले नाहीत. मग सातारा शहरातच आमच्यावर हा अन्याय का? प्रशासनाने आम्हाला पर्यायी जागा दिली आहे; पण तेथे सुविधा नसल्यामुळे ती जागा आम्हाला मान्य नाही. त्यामुळे काहीही झालं तरी आम्ही फूटपाथवरच व्यवसाय करणार, अशी भूमिका हॉकर्सनी घेतली आहे.


रस्त्यावर व्यवसाय करून आम्ही हॉकर्स कुटुंबाचा गाडा हाकत आहे. भांडणं करत बसलो तर कुटुंब उपाशी मरेल. मारामारीच्या घटनेने हॉकर्समध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी अशा गुंडांना वेळीच आवरावे, अन्यथा कायदा हातात घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. जिल्ह्यातील १५ हजार हॉकर्स रस्त्यावर उतरून आमची ताकद दाखवून देऊ.
- संजय पवार,
शहराध्यक्ष,
हॉकर्स संघटना, सातारा

Web Title: Laws in the hands of law breakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.