किरकोळ कारणावरुन साताऱ्यात वकिलाला मारहाण; तिघांवर गुन्हा
By दत्ता यादव | Published: September 21, 2022 04:25 PM2022-09-21T16:25:14+5:302022-09-21T16:25:42+5:30
सातारा: ‘तू आपला जा,’ असं म्हणाल्याच्या कारणावरून एका ३० वर्षीय वकिलाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर ...
सातारा: ‘तू आपला जा,’ असं म्हणाल्याच्या कारणावरून एका ३० वर्षीय वकिलाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मुज्जमील शेख, शाहीद बागवान, जहीद बागवान (सर्व रा. सोमवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना सोमवारी, (दि. १९) रात्री साडेनऊ वाजता कन्याशाळेच्या पाठीमागील बाजूस घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सूरज प्रताप पवार (वय ३०, रा. गुरुवार पेठ, सातारा) हे वकील असून, त्यांचा भाचा प्रज्वल महेंद्र कांबळे याला मुज्जमील शेखने ‘तू एवढा वेळ गाडी घेऊन बाहेर का फिरतोय,’ असे म्हणून त्याच्या कानाखाली मारली. त्यावेळी वकील सूरज पवार यांनी ‘तू आपला जा,’ असे म्हणाल्याच्या कारणावरून मुज्जमील शेखने त्याच्या दोन्ही मित्रांना बोलावून घेतले. त्यानंतर वकील सूरज पवार यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्यापैकी एकाने सूरज पवार यांच्या डोक्यात दगड मारला. यामध्ये ते जखमी झाले.
या प्रकाराची माहिती त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी वरील तिघांवर गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक बशीर मुलाणी हे अधिक तपास करीत आहेत.