लोकांची अडचण सोडविणारा नेता हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:45 AM2021-09-14T04:45:50+5:302021-09-14T04:45:50+5:30
पाचगणी : ‘महाबळेश्वरसारख्या दुर्गम तालुक्यातून दादांनी जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व सलग २५ वर्षे केले. मतदारसंघ बदलून पण लोकांनी त्यांना निवडून ...
पाचगणी : ‘महाबळेश्वरसारख्या दुर्गम तालुक्यातून दादांनी जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व सलग २५ वर्षे केले. मतदारसंघ बदलून पण लोकांनी त्यांना निवडून दिले. राज्यात पहिला निर्मल तालुका बनविण्याचे काम त्यांनी केले. स्ट्राबेरी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले. पुस्तकांचे गाव उभारण्यासाठी योगदान दिले. दादांच्या निधनाने महाबळेश्वर दुर्गम भागतील वाडी-वस्तीवरील लोकांची अडचण सोडविणारा नेता हरपला,’ अशी भावना पालकमंत्री बाळासाहेब पाटील व्यक्त केली.
महाबळेश्वर तालुक्याचे भाग्यविधाते बाळासाहेब भिलारे यांच्यावर भिलार येथील स्मशानभूमीत हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. मुलगा नितीन भिलारे, जतीन भिलारे यांनी दादांना मुखाग्नी दिला. त्यानंतर झालेल्या शोकसभेत ते बोलत होते.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाचे वृत्त समजताच महाबळेश्वरसह वाई आणि जावळी तालुक्यातील त्यांचे स्नेही, समर्थक मोठ्या संख्येने भिलारमध्ये जमा झाले. बावधन येथील मंगलमूर्ती सोशल क्लबचा फुलांनी सजवलेला रथ ट्रॅक्टर साह्याने स्मशानभूमीत नेण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी महिलांनीही अखेरचे दर्शन घेऊन त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचली. यानंतर नेत्यांनी दादांना श्रद्धांजली वाहिली.
श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘छोटी-मोठी पुस्तके कुणीही हाताळतो; पण ग्रंथ हाताळणारा माणूस गेल्याची भावना दादांच्या जाण्याने झाली आहे. शेतीची नाळ जोडलेला, पुस्तक आणि निर्सगाशी जोडलेला हा नेता होता. महाबळेश्वर तालुक्यावर आलेली विविध बंधन, निर्बंध हटविण्याठी प्रयत्न करून त्यात यश आले तरच ती दादांना खरी श्रद्धांजली ठरेल.’शशिकांत शिंदे म्हणाले, ‘दादांची क्षमता स्वतः आमदार होण्याची होती; पण त्यांनी मला आणि मकरंद आबांना आमदार बनविले. वेळ काळ न बघता अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहणारा, त्यागी वृत्तीचा, अपेक्षापेक्षा कर्तव्य महान मानणारा नेता अशी दादांची ओळख आहे. आमच्या कामाचे कौतुक करणारा माणूस निघून गेला. आम्ही ज्या नेत्यामुळे घडलो तो नेता सोडून गेल्याचे दुःख मोठे असून, असा नेता होणे नाही.’
मकरंद पाटील म्हणाले, ‘२००२ साली सदस्य झालो, तेव्हा ते ज्येष्ठ सदस्य म्हणून कार्यरत होते. तेव्हा ते उपाध्यक्ष होते. जिल्हा परिषदेच्या सगळ्या विभागाची खडानखडा माहिती त्यांना होती. दादा आदर्श जिल्हा परिषद सदस्य होते. दादांमुळेच मी आमदार होऊ शकलो. त्यांच्या मार्गदर्शनातूनच आम्ही मतदारसंघात कार्यरत. दादांच्या जाण्याने घरातील माणूस सोडून गेल्याची भावना झाली आहे.’
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, शिवसेना नेते विजय चौगुले, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे, बाबूराव संकपाळ, डी. एम. बावळेकर, हरीश पाटणे, सुनील माने, विठ्ठल माने, राजेंद्र भिलारे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी दत्तानाना ढमाळ, शशिकांत पवार, महादेव मस्कर, विठ्ठल शिंदे, तेजस शिंदे, राजेंद्रशेठ राजपुरे, संजय गायकवाड, गॅबरियल फर्नांडिस, मोहन भोसले, अनिल सावंत, प्रमोद शिंदे, दिलीप बाबर, संजय उत्तेकर, गणपतराव पार्टे, बाळासाहेब चिरगुटे, मनोज पवार, राजेंद्र तांबे, राजेश कुंभारदरे, अमित कदम आदींसह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो आहेे..
पाचगणी
भिलार (ता. महाबळेश्वर) येथे बाळासाहेब भिलारे यांची रविवारी अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. (छाया : दिलीप पाडळे)