नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला!
By admin | Published: August 3, 2015 09:37 PM2015-08-03T21:37:09+5:302015-08-03T21:37:09+5:30
आमदारांच्या तालुक्यांतील राजकारण निघाले ढवळून --ग्रामपंचायतींसाठी आज मतदान : ५५० ग्रामपंचायतींच्या हद्दीत जागता पहारा; स्थानिक राजकारणाची सत्वपरीक्षा
सातारा : जिल्ह्यातील ५५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. ४) मतदान होणार आहे. यापैकी बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी, तिरंगी लढती होत असून, गटा-तटाचे राजकारण उफाळून आले आहे. या ग्रामपंचायतीच्या निमित्ताने खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मागील निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता झाली का?, या मुद्द्यावर मतदारांनी सत्ताधाऱ्यांना जोखले आहे, तर निवडणुकीत उतरलेले विरोधक केवळ विरोधाला विरोध करत आहेत की, त्यांचा गावच्या विकासाचा साफ हेतू आहे, याचीही जमाबेरीज मतदारांनी केली असून, आज ते आपला निकाल मशीनबंद करणार आहेत.सातारा तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींपैकी अलवडी, निसराळे, सायली, वेचले, अंबवडे खुर्द, भोंदवडे, वावरदरे, कामथी, वळसे, यवतेश्वर, विजयनगर, आष्टे या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटांना यश आले. पण, इतर २९ ग्रामपंचायतींमध्ये टस्सल होणार आहे. यापैकी खेड, क्षेत्रमाहुली, डोळेगाव, संगममाहुली, संभाजीनगर, विलासपूर या ग्रामपंचायतींसाठी राष्ट्रवादीअंतर्गत गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वत: खेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष घातले होते. गावात येऊन त्यांनी खेड पंचक्रोशी विकास पॅनेलच्या उमेदवारांसोबत प्रचार फेरीही काढली. चंद्रकांत लोखंडे, मिलिंद पाटील, नम्रता उत्तेकर, हरिभाऊ लोखंडे आदींनी सत्ताधारी राष्ट्रवादी सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात रान उठविले. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या नसल्या तरी राजकीय गरमागरमी कायम आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप मोझर यांच्या गटाने पीरवाडीत तीन उमेदवार उभे केले असून, मोझर यांच्या मातोश्रीही याठिकाणी उभ्या आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी पॅनेलनेही १७ सदस्यांच्या या ग्रामपंचायतीत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड केली. वाईमध्ये ७१ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून, बावधन, पसरणी, उडतारे, बोपेगाव, शिरगाव, अभेपुरी या गावांत आमदार मकरंद पाटील व किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात पॅनेल उभे केले. शिवसेनेही जमेल तेवढे उमेदवार उभे केले. उडतारे ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा सहकार बोर्डाचे माजी अध्यक्ष कांतिलाल पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप बाबर यांच्या गटाविरोधात काँगे्रसच्या प्रवीण पवार, सुरेश पवार यांच्या गटाने पॅनेल उभे केले. स्थानिक नेतेमंडळींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. (प्रतिनिधी)
खटाव, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांत अटीतटीची लढत
खटावमध्ये ८८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. चंद्रकांत पाटील, आमदार जयकुमार गोरे, शिवसेनेचे रणजित देशमुख यांच्या गटांनी तालुक्यात आक्रमक हालचाली करून ग्रामपंचायतींची सत्ता मिळविण्याचे फासे टाकले. त्यामध्ये पुसेगाव, पुसेसावळी, सिद्धेश्वर कुरोली, कातरखटाव या निवडणुकांकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
खंडाळा तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. विंग, सांगवी, खंडाळा, भादे, कणेरी या राजकीयदृष्ट्या संवेदनशील ग्रामपंचायतींसाठी राजकीय आखाडा तापला आहे. आ. मकरंद पाटील, माजी आ. मदन भोसले, शिवसेनेच्या शारदा जाधव, हणमंतराव साळुंखे, आनंदराव गायकवाड, राजेंद्र नेवसे, बंटी महांगरे, साहेबराव महांगरे यांचे गट वेगाने कामाला लागले आहेत. महाबळेश्वरातील २४ पैकी १६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, आ. मकरंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भिलारे, शिवसेनेचे डी. एम. बावळेकर यांच्या गटांनी सत्ता मिळविण्यासाठी जंग पछाडले.
सातारा तालुक्यात सात केंद्रे संवेदनशील
सातारा : सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात परळी, शेंद्रे, कण्हेर, पवाराची निगडी, खेड, पीरवाडी आणि प्रतापसिंहनगर या मतदानकेंद्रांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ११५ मतदानकेंद्रांवर पोलीस आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच तालुका हद्दीतील २८ गावांचे तीन विभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक विभागात एक उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचारी वाहनाद्वारे गस्त सुरू ठेवणार आहेत. प्रत्येक अधिकाऱ्यासाठी एक अशी दहा वाहने पोलिसांनी तैनात ठेवली आहेत. शिवाय, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक स्वतंत्र वाहनातून संवेदनशील गावांवर नजर ठेवणार आहेत. तक्रारी नोंदवून घेण्यासाठी एक पथक पोलीस ठाण्यातच ठेवण्यात येणार आहे.
पोस्टल मतदान नाही...
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोस्टल मतदान होणार का? हा प्रश्न होता. पण, निवडणूक आयोगाने त्याबाबत स्पष्ट निर्देश न दिल्याने पोस्टल मतदान होणार नाही, हे आता स्पष्ट झाले असल्याने अनेकांना आपल्या गावच्या निवडणुकीतील मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.
शासकीय कार्यालये बंद
जिथे निवडणूक लागली आहे, त्या गावातील शासकीय कार्यालये, शाळा बंद ठेवण्यात येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक सुटी जाहीर केलेली आहे. मात्र, इतर ठिकाणी नोकरीला असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुटी मिळणार नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.
निवडणूक कर्मचाऱ्यांनाही मतदानाची संधी
निवडणुकीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदानाची संधी मिळणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण, जिल्हा प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांची आपल्या गावाजवळच नेमणूक केली असून, त्यांना मतदानासाठी काही काळ बाहेर जाता येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
आमदारांच्या तालुक्यांतील राजकारण निघाले ढवळून
कऱ्हाडातील ९८ ग्रामपंयतींपैकी राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या तासवडे, विरवडे, करवडी, कोडोली, गोळेश्वर, नांदलापूर, चिखली, गोटे, शेरे, किरपे, केसे, शिवडे, इंदोली, पाल, शिरवडे, बनवडी, वारुंजी, गोटेवाडी, काले, भरेवाडी, येरवळे, हणबरवाडी, शेणोली, हजारमाची, वाघेर, विंग, बेलवडे बुद्रुक, पेरले, उंब्रज, कार्वे, सवादे या गावांत राजकीय आखाडा तापला होता.
माण तालुक्यात शेखर गोरे यांनी बंधू आमदार जयकुमार गोरे यांना खुले आव्हान दिले असून, आंधळी सोसायटीच्या निवडणुकीतील चित्र पुन्हा पाहायला मिळत आहे.
पाटण तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, जिल्हा बँकेचे माजी संचालक भगवानराव पाटील यांच्या गटांनी जोरदार धुरळा उडवून दिला होता. कुंभारगावात तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. चिखलेवाडी, जानुगडेवाडी या ग्रामपंचायतींमध्येही मोठी टस्सल होणार आहे.
कोरेगावात ४९ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ३९ ग्रामपंचायतींपैकी ८ वॉर्ड बिनविरोध झाले आहेत. तारगाव, किन्हई, धामणेर, ल्हासुर्णे, दुदी या गावांतील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. राष्ट्रवादी आणि काँगे्रस यांनी केलेल्या स्थानिक आघाड्यांमध्ये शिवसेनेही आपले उमेदवार उभे केले आहेत.
जावळीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, मोहन शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, सुहास गिरी, निर्मला कासुर्डे, संगीता चव्हाण यांच्या स्थानिक गटाची ताकद या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
फलटणमध्ये ७८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यामध्ये कोळकी, निंबोरे, साखरवाडी या ग्रामपंचायतींमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचे गट साखरवाडीत समोरासमोर होते. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गटानेही मधल्या काळात जोरदार हालचाली केल्या.