नेत्यांची ‘बघाबघी’ राष्ट्रवादीसाठी धक्कादायक

By admin | Published: January 30, 2015 09:28 PM2015-01-30T21:28:16+5:302015-01-30T23:15:18+5:30

सत्तांतरानंतरचा सातारा : ‘शिव’धनुष्याच्या प्रत्यंचेला खासदारांचाच टणत्कार; उदयनराजेंचा आक्रमक भुमिकेमुळे प्रस्थापित प्रचंड अस्वस्थ

Leaders are 'shocked' for NCP | नेत्यांची ‘बघाबघी’ राष्ट्रवादीसाठी धक्कादायक

नेत्यांची ‘बघाबघी’ राष्ट्रवादीसाठी धक्कादायक

Next

सातारा : दहा वर्षांच्या बिनतोड सत्तेचा सरताज डोक्यावरून खाली उतरताच जिल्ह्यात प्रबळ असूनही राष्ट्रवादी व काँगे्रस नेत्यांना विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यात शिवतारेंच्या रूपाने धनुष्याच्या प्रत्यंचेचा टणत्कार वाजू लागला असून, खासदार उदयनराजे भोसले यांचीही साथ त्यांना मिळत असल्याने हा टणत्कार राष्ट्रवादी नेत्यांच्या संतापाचे कारण ठरला आहे. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत राज्यात राष्ट्रवादी व काँगे्रसची सत्ता होती. ही सत्ता जाऊन पुन्हा युतीची सत्ता आली आहे. या परिस्थितीतही जिल्ह्याने राष्ट्रवादी व काँगे्रसलाच मागील विधानसभा निवडणुकीत पसंती दिली. शंभूराज देसाई यांच्या रूपाने शिवसेनेचा एकमेव आमदार आहे. राज्यातील सत्ता गेल्याने जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही राष्ट्रवादीच्या हातून गेले असल्याने राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या आमदारांना विरोधी बाकावर बसावे लागत आहे. जिल्ह्यातील विकासकामांच्या अनुषंगाने महत्त्वाची असणाऱ्या जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्षपद गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादीकडे होते. आता जिल्हा नियोजन समितीमध्ये संख्याबळ मोठे असूनही राष्ट्रवादी व काँग्रेस विरोधात आहे. राज्यातील सत्ता बदलामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेकडे गेले असून, विजय शिवतारे जिल्ह्यात आपला वचक वाढवू पाहत आहेत. शिवतारेंना संख्याबळाच्या आधारावर कोंडीत पकडण्यासाठी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते चांगली तयारी करून आले होते. बैठकीच्या सुरुवातीला आमदार शशिकांत शिंदे, रामराजे नाईक-निंबाळकर, मकरंद पाटील यांनी असे प्रश्न उपस्थित करून पालकमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला; परंतु पालकमंत्र्यांनी अभ्यासपूर्णरीत्या व शांत वृत्तीने या प्रश्नांना योग्य ती उत्तरे दिली व वाद उद्भवू दिला नाही. या सभेत पालकमंत्री सावधपणे उत्तरे देताना आढळले. या बैठकीला पालकमंत्र्यांच्या शेजारी जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले हेही बसले होते. त्यांनी मात्र आपल्याच पक्षावर संधी मिळेल तेव्हा शरसंधान साधले. ‘औंधला मोठा निधी कसा मिळाला?, पाच वर्षांत एकदाही बोललो नाही, आता मला बोलू द्या,’ असे म्हणत उदयनराजेंनी स्वपक्षामधील राजकारणालाच हात घातला. साहजिकच उदयनराजेंच्या शाब्दिक बाणांनी राष्ट्रवादीचे नेते घायाळ होत होते. ‘न बोलताही तुमची कामे होत होती,’ असे सांगत आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, उदयनराजेंच्या शब्दांनी त्यांनाही घायाळ केल्याचे चित्र पाहायला मिळाले. शशिकांत शिंदे व रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मागील काळात जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सांभाळले होते. त्यांच्याच काळात उदयनराजेंना बोलू दिले नाही काय?, असा अर्थ यानिमित्ताने काढला गेला. भविष्यामध्ये पालकमंत्र्यांचा वारू रोखण्याआधी राष्ट्रवादी नेत्यांना उदयनराजेंनाच कसे सांभाळून घ्यायचे?, याची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. (प्रतिनिधी)

शशिकांत शिंदे म्हणे,’ बघून घेतो...!’
राजेच आपल्या बाजूने आहेत, म्हटल्यावर नूतन पालकमंत्र्यांनाही बळ मिळाले; पण राष्ट्रवादी नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. उदयनराजेंच्या अनेक वाक्यांमुळे राष्ट्रवादी नेत्यांना तोंडावर पाडले. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी नियोजन भवनाबाहेर पडताना नाराजी व्यक्त केली. तसेच ‘ते बघून घेतो...!,’ असेही म्हणाल्याचे उदयनराजेंनी उपस्थित पत्रकारांना सांगून टाकले. त्यामुळे ही तणातणी आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Web Title: Leaders are 'shocked' for NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.