नेते बाजूला...मराठा समाज एकवटला..!

By admin | Published: September 11, 2016 11:52 PM2016-09-11T23:52:14+5:302016-09-11T23:52:14+5:30

विराट मोर्चाची तयारी : एक मराठा..लाख मराठा घोषणेने परिसर दुमदुमला; क्रांती मोर्चात लाखोंनी सहभागी होण्याचे आवाहन, गट-तट विसरून एकत्र आले

Leaders aside ... Maratha community assembled ..! | नेते बाजूला...मराठा समाज एकवटला..!

नेते बाजूला...मराठा समाज एकवटला..!

Next

सातारा : ना कोणते व्यासपीठ ना हारतुरे..ना सत्काराशिवाय मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन करण्यासाठी पक्ष, गट-तट विसरून आणि जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्याच्या अनुपस्थितीत मराठा समाज रविवारी एकवटला. ‘एक मराठा...लाख मराठा, हर हर महादेव,’ अशा घोषणांनी परिसर अक्षरश: दणाणून गेला. तीन आॅक्टोबरच्या मोर्चात लाखोंनी सहभागी व्हा, अशी हाक देत मोर्चाचे नेतृत्व प्रत्येकानेच करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन करण्यासाठी कृष्णानगर येथील स्वराज मंगल कार्यालयात रविवारी दुपारी जिल्ह्यातून सुमारे तीन हजारांहून अधिक मराठा समाजातील लोक एकत्र जमले. यामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. मंगल कार्यालयातील व्यासपीठावर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. व्यासपीठावर कोणीही बसले नव्हते. कार्यालयाच्या मधोमध गोल राऊंडमध्ये सर्वजण बसले होते. मराठा क्रांती मोर्चा हा राजकीय नसून कोणताही पक्ष आणि संघटनेशिवाय निघणार असल्याचे सुरुवातीलाच सांगण्यात आले.
बैठकीच्या सुरुवातीला कोपर्डीतील बळी पडलेल्या पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे आमदार नरेंद्र पाटील, शिवाजी पासलकर, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, अनिल देसाई, हरीष पाटणे, प्रशांत पवार, शरद काटकर, जयेंद्र चव्हाण, शर्मराज जगदाळे, गीतांजली कदम आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. तर माजी आमदार सदाशिव सपकाळ, संदीप मोझर, यशवंत पाटणे, अमोल मोहिते, अमोल तांगडे, रवी साळुंखे, सुनील काटकर, अविनाश मोहिते, चंद्रशेखर चोरगे, समृद्धी जाधव, सुधीर धुमाळ, अ‍ॅड. नितीन भोसले, शिवसेनेचे चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
साताऱ्यातील या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वांनी केले. (प्रतिनिधी)
अन् सभागृह स्तब्ध झाले!
‘नका ठेवू वाईट नजरा...मराठ्यांच्या आरक्षण अन् लेकींवर..पेटून उठलाय महाराष्ट्र सारा..मराठ्यांच्या एकीवर..,’ असं प्रास्ताविकात एका सर्वसामान्य कार्यकर्त्याने सांगून त्याने हातातील पत्रक वाचून दाखविले. यावेळी सभागृह अक्षरश: स्तब्ध झाले. कोपर्डीत जे घडलं ते बघून सह्याद्रीची मान शरमेने झुकली असेल. कृष्णा, कोयना, उरमोडीलाही अश्रू अनावर झाले असतील. आणि माणूस म्हणून आपल्याही डोळ्याच्या कडा ओलावल्या असतील; पण आपण दुसऱ्याच क्षणी आपल्या संसारात, नोकरीत, व्यापारात, उद्योगात मग्न होऊन जातो. मला काय त्याचे! या वृत्तीमुळेच कदाचित हैवानी शक्तींचा जोर वाढला आहे. अजून किती अत्याचाराच्या बातम्या आपण वृत्तपत्रातून वाचून टीव्हीवर बघून क्षणिक हळहळ व्यक्त करून थांबणार आहोत? या जगाच्या विनाशासाठी दुर्जनांच्या कृती पेक्षा सज्जनांची शांतता अधिक धोकादायक आहे. चला या कोपर्डीच्या घटनेचा निषेध नोंदवू या..मोर्चात सहभागी होऊ या.. काल दिल्ली, आज कोपर्डी, उद्या कदाचित माझ्या घराचा पत्ता ही विकृती शोधत असेल. या पाशवी वृत्तीचा नायनाट हाच समृद्ध, सुसंस्कृत व सुरक्षित समाजाचा पाया ठरला पाहिजे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कवच कुंडले घालून मराठा समाजाच्या लोकांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीच्या खोट्या केसेस घालून आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची भीती घालून ब्लॅकमेलिंग करून मराठ्याच्या कष्टाच्या घामाच्या पैशावर दरोडे टाकणाऱ्या प्रवृत्तीचा समूळ बिमोड करण्यासाठी हा मराठा क्रांती मोर्चा आहे. शैक्षणिक गुणवत्ता, पात्रता असताना देखील निव्वळ आरक्षणाच्या जोरावर लाखो मराठा तरुणांच्या भवितव्यावर गदा आणणाऱ्या आरक्षण धोरणा विरोधात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र या, असे आवाहनही करण्यात आले.
प्रत्येकाची घेतली
लेखी नोंद !
४मराठा समाज मोर्चाच्या नियोजनासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे नाव आणि पत्ता लिहून घेतला जात होता. मोर्चामध्ये कोणी काय करायचे, याचे नियोजन केले जात होते. उत्स्फूर्तपणे लोक आपले नाव नोंदवत होते.
१ लाख पाण्याच्या बाटल्या मोर्चात वाटणार...
४मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांना सचिन राजेशिर्के आणि सुनील शितोळे हे दोघेजण १ लाख पाण्याच्या बाटल्या वाटणार आहेत. पाणी पिऊन झाल्यानंतर त्या बाटल्या स्वत:जवळ ठेवून पालिकेच्या कचरा गाडीमध्ये टाकण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
मेटल डिटेक्टरने
प्रत्येकाची तपासणी...
४स्वराज मंगल कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला मेटलडिटेक्टरमधून जावे लागत होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. याशिवाय साध्या वेशातील पोलिस आणि गोपनीय पोलिसही या नियोजनाच्या बैठकीवर लक्ष ठेवून होते.
घोषणा न देता मोर्चा...
४क्रांती मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनी कसल्याही घोषणा द्यायच्या नाहीत. शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. महाविद्यालयीन युवक, युवतींनाही तसेच घरातील सर्व सदस्यांना या मोर्चामध्ये सामील करून घ्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Web Title: Leaders aside ... Maratha community assembled ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.