नेत्यांच्या दारी स्वर्ग... शहरात मात्र नरक !
By admin | Published: December 10, 2015 11:59 PM2015-12-10T23:59:52+5:302015-12-11T00:48:11+5:30
पालिकेची यंत्रणा नगरसेवकांच्या घरापुरतीच : कचरा टाकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाईच्या तरतुदीची आवश्यकता--कचरा ‘कोंडी’
सातारा : कचरा... प्रत्येकजण याची जबाबदारी पालिका किंवा अन्य यंत्रणेवर ढकलून रिकामा होतो. काही चाणाक्ष लोकप्रतिनिधी शासनाची यंत्रणा राबवून आपले अंगण स्वच्छ करून घेतात. पण ज्यांच्या घराशेजारी लोकप्रतिनिधी राहत नाहीत, त्यांच्या घरापुढे कचऱ्याचा नरक आहे!
सातारा शहरात कचरा उचलण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून वॉर्डनिहाय घंटागाडीची सोय करण्यात आली आहे. घंटागाडी अवेळी येणं किंवा कमी वेळेसाठी थांबणे यामुळे अनेकदा चार दिवसांचा कचरा साठवून ठेवावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी शहरातील काही मोजक्या आणि वर्दळीच्या ठिकाणी पालिकेच्या वतीने कचरा कुंडी ठेवण्यात आली आहे.
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात शिकलेले आणि व्यवहारज्ञान असणारी माणसं राहतात, असा एक समज आहे. पण कचराकुंडीच्या वापरात हा समज सातारकरांनी धुळीस मिळविला आहे. कचराकुंडीपासून फुटभर अंतरावर विखुरलेला केर बरेच काही सांगून जातो. कुंडीत टाकायला आणलेला केर कुंडीबाहेर टाकून सातारकरांना काय मिळते माहीत नाही, पण साताऱ्यात पाहुणे म्हणून येणाऱ्या अनेकांनी या अस्वच्छतेकडे सातारकरांचे गबाळेपण म्हणून अंगुलीनिर्देश केला आहे.
बहुतांश घंटागाडी भल्या पहाटेच येऊन जातात. त्यावेळी गृहिणी पाणी किंवा मुलांच्या शाळेच्या तयारीत असतात. त्यामुळे घंटागाडी कितीही वाजवत राहिली तरी गृहिणीला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. नोकरदार महिला स्वत:ची गाडी असेल तर आॅफिसला जाता-जाता हा केर कचरा कुंडीत टाकते. काहीवेळा पतीच्या मागे बसून नेम धरून कचरा कुंडीत टाकण्याऐवजी अन्यत्र पडतो. आपला कचरा आपणच कचरा कुंडीत टाकण्याची सवय प्रत्येकाने लावली तर शहरातील हे विद्रुपीकरण बंद होईल. सातारकरांनी आपल्या घरासारखीच शहराच्या स्वच्छतेची काळजी घेतली तर अनेक प्रश्न प्रबोधनाशिवायही मिटून जातील यात शंका नाही. (प्रतिनिधी)
कुंडीत भरतंय वासराचं पोट..
सातारकरांना अद्यापही कचरा कुंडीत कसा टाकायचा याचे प्रशिक्षण दिले गेले नसल्याचे पाहायला मिळते. कचरा कुंडी ऐवजी मोठ्या प्रमाणावर कचरा कुंडीच्या आजूबाजूला पसरलेला असतो. कित्येकदा काही अतिशहाणे गाडीवरूनच केराची पिशवी भिरकवतात आणि मग या घाणीत अधिक भर पडत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली.
स्वच्छतेसाठी बॅनर
लावूनही गाढवपणा !
वारंवार सांगूनदेखील नेहमीच्याच सोयीने भरचौकात कचरा टाकणाऱ्या नागरिकांना समज देण्यासाठी काही जणांंनी शक्कल लढवून गाढवाच्या फलकाचा वापर केला आहे. ‘होय मी गाढवच आहे. मी येथेच कचरा टाकणार’ असा मजकूर लिहिलेला फलक असूनही कचरा टाकणे याठिकाणी बंद झालेले नाही. त्यामुळे कचरा टाकणारे गाढवच ठरले आहेत, असे यातून स्पष्टपणे सूचित होत आहे.
‘घंटा’पेक्षा
कुंडी बरी...
स्वच्छ व सुंदर सातारा साकारण्यासाठी शहरातील कचरा निर्मूलन ही एक महत्त्वाची बाब आहे. यासाठी पालिकेने सतत कचरा उचलण्यासाठी अगदी कुंडीपासून घंटागाडीचा वापर करून विविध उपाययोजना केल्या आहेत. तरीदेखील सदरबझार येथील हिरवाईजवळ वर्षांनुवर्षांपासून जीर्ण झालेल्या कुंडीतच नागरिक कचरा टाकत आहेत.
कुंडीपेक्षा कचरा अधिक असल्याने हा कचरा दिवसभर परिसरात विखुरलेला असतो. घंटागाडीची वेळ निश्चित नसल्याने घंटागाडीपेक्षा जीर्ण झालेल्या कुंडीचाच वापर नागरिकांना अधिक योग्य वाटतो.