गावोगावी साकारणार घनकचऱ्याचा पथदर्शी प्रकल्प...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:46+5:302021-07-12T04:24:46+5:30

खंडाळा : घनकचरा ही सर्वच गावांची मोठी समस्या बनली आहे. स्वच्छ गाव, सुंदर गाव, ही संकल्पना गावोगावी राबत असली ...

Leading solid waste project to be set up in villages ... | गावोगावी साकारणार घनकचऱ्याचा पथदर्शी प्रकल्प...

गावोगावी साकारणार घनकचऱ्याचा पथदर्शी प्रकल्प...

Next

खंडाळा : घनकचरा ही सर्वच गावांची मोठी समस्या बनली आहे. स्वच्छ गाव, सुंदर गाव, ही संकल्पना गावोगावी राबत असली तरी प्रत्येक घरातील कचरा त्याला अडथळा ठरत आहे. त्यासाठी घरच्या कचऱ्याचा वापर करून त्यापासून सेंद्रिय फळभाज्यांची निर्मिती करण्याचे नियोजन खंडाळा पंचायत समितीने केले आहे. त्यातूनच गावोगावी घनकचरा व्यवस्थापनचा पथदर्शी प्रकल्प उभारणार आहे.

मानवाच्या रोजच्या कृतीतून तयार होणाऱ्या कचऱ्याचा योग्य वापर केला तर ‘टाकाऊ पदार्थ’सुद्धा मौल्यवान स्रोत होऊ शकतो. मानवी समाजात घन कचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी व जमीन प्रदूषित होऊन मानवी अधिवासाला धोका निर्माण होत आहे. घन कचऱ्याचे संकलन, साठवण, प्रक्रिया व विल्हेवाट किंवा पुनर्वापर या बाबी घनकचरा व्यवस्थापनात येतात. याचा अभ्यास करून सभापती राजेंद्र तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारला जाणार आहे.

स्वच्छतेबाबत कचरा प्रकल्प उभारणारी गुठाळे ही तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. येथे नागरिकांकडून ओला, सुका कचरा वेगळा करून ठेवला जातो. त्यामुळे वर्गीकरणाचा ताण कमी होतो. येथे स्वच्छता हीच सेवा अतंर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प घरोघरी उभारण्यात आले आहेत. सामाजिक दायित्व निधीतून गावातील २७० घरांत घनकचरा व्यवस्थापन व कचऱ्यापासून खतनिर्मिती मिशन देण्यात आले आहे, त्याचा वापर केला जात आहे.

या प्रकल्पाची पाहणी सभापती राजेंद्र तांबे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन आडे, कृषी विस्तार अधिकारी दत्तात्रय कचरे, पाणीपुरवठा उपअभियंता कांचन भोईटे, लघु पाटबंधारे उपअभियंता रवींद्र धोत्रे, बांधकाम सहायक अभियंता जे. बी. धायगुडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शन काकडे, अतुल गायकवाड यांनी करून त्याचा आराखडा तयार केला आहे. त्याद्वारे प्रत्येक गावी असे प्रकल्प निर्माण करण्यात येणार आहेत.

चौकट...

कचऱ्याचे स्रोत :

घरगुती कचऱ्यात टाकाऊ कागद, कागदी वस्तू व वेष्टने, घराभोवतीच्या झाडांची पाने, फुले व फांद्या, पिकांचे टाकून दिलेले भाग, जनावरांचे मलमूत्र त्याचबरोबर विघटनशील असणारा खराब अन्न, फळे, भाजी, कागद, माती, राख या कचऱ्याचा वापर केला जात आहे.

चौकट..

सेंद्रिय खतांची निर्मिती :

घरात जमा होणाऱ्या या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी प्रत्येक घरी प्लॅस्टिकचा बॅरल वापरण्यात येणार आहे. यात जुन्या सेंद्रिय पद्धतीने पुनर्नविनीकरण केले जाणार आहे. सेंद्रिय कचऱ्याच्या विघटनाची नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे खत किंवा कंपोस्ट याचे उत्पादन, यामध्ये पोषक द्रव्ये अतिशय समृद्ध असतात. कंपोस्टिंग म्हणजे जैविक प्रक्रिया असून, त्यात सूक्ष्मजीव, मुख्यतः बुरशी आणि जीवाणू असतात, जसे की पदार्थासारख्या अवयवयुक्त कचऱ्यात बुरशीचे रूपांतर होते. हे तयार झालेले उत्पादन मातीसारखे दिसते.

(चौकट)

घरच्या घरी भाज्या...

या प्रकल्पांतर्गत बॅरलमध्ये तयार झालेल्या खतात कार्बन आणि नायट्रोजन यांचे प्रमाण जास्त असते आणि वाढणाऱ्या वनस्पतींसाठी ते एक उत्कृष्ट माध्यम असते. त्यामुळे यात टमाटा, वांगी, मिरची, कारले, भोपळा, दोडका, गवार तसेच पालेभाज्यांची रोपे लावून उत्पादन घेतले जाते. त्यातून प्रत्येक कुटुंबाला घरच्या घरी भाज्या उपलब्ध होतात.

(कोट..)

तालुक्यातील प्रत्येक गावात हा प्रकल्प राबविण्याचा मानस आहे. कमी वेळेत अधिक आणि उठावदार काम होण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. याबाबत गुठाळेचा आदर्श इतर ग्रामपंचायतींनी घेऊन वाटचाल करावी. या प्रकल्पासाठी सर्व गावचे सरपंच व ग्रामसेवक यांचे एक शिबिर घेण्यात येणार आहे.

-राजेंद्र तांबे, सभापती

..............................................

फोटो - गुठाळे येथील घरगुती कचरा प्रकल्पाची पाहणी सभापती राजेंद्र तांबे व अधिकारी वर्गांनी केली.

Web Title: Leading solid waste project to be set up in villages ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.