कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती, सातारा शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार
By सचिन काकडे | Published: November 20, 2023 06:33 PM2023-11-20T18:33:33+5:302023-11-20T18:34:38+5:30
गळती काढण्याबरोबरच सांबरवाडी जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार
सातारा : कास पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला कासाणी व आटाळी येथे मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पालिकेकडून गुरुवार, दि. २३ रोजी गळती काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे गुरुवार व शुक्रवारी कास योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कास ही सर्वात जुनी पाणीयोजना असून, या योजनेतून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जातो. योजनेच्या मुख्य जलवाहिनीला सातत्याने गळती लागत असल्याने शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. कासाणी व आटाळी या गावाजवळ सोमवारी मोठी गळती लागली असून,पाण्याचा अपव्यय सुरू झाला आहे.
पाणीपुरवठा विभागाकडून गुरुवारी ही गळती काढण्याबरोबरच सांबरवाडी जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामामुळे गुरुवारी कास माध्यमातील पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी, बालाजी नगर, कांबळे वस्ती, जांभळेवाडा तसेच कात्रेवाडा टाकीतून होणारा सायंकाळ सत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तर शुक्रवारी पॉवर हाऊस येथून यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ, कात्रेवाडा टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी, कोटेश्वर टाकीतून सकाळ सत्रात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करुन पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.