शिकू इतिहास... घेऊ स्वच्छतेचा ध्यास !
By Admin | Published: June 15, 2017 10:45 PM2017-06-15T22:45:50+5:302017-06-15T22:45:50+5:30
शाळांमध्ये किलबिलाट : ‘लोकमत’च्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत...
स्वच्छ शाळा... स्वच्छ सातारा... शाळेच्या पहिल्याच दिवशी सातारा व कऱ्हाड शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांचे ‘लोकमत टीम’च्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छ शाळा... स्वच्छ सातारा...’ असा संकल्प घेतला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पहिल्या दिवशी ‘लोकमत’ची टीम पोहोचली. शहरातल्या शाळा-शाळांत आणि नवीन शैक्षणिक वर्षासाठी दिल्या शुभेच्छा... गेली सहा वर्षे सातत्याने हा उपक्रम राबवत असल्याबद्दल सर्वच शाळांनी ‘लोकमत’चे आभार मानले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गुरुवार १५ जून... शाळेचा पहिला दिवस सातारा शहरातील सर्व विद्यार्थ्यांनी हा दिवस ‘लोकमत’च्या साथीने उत्साहात साजरा केला. सातारा व कऱ्हाड शहरातील तब्बल ५० शाळांमध्ये ‘लोकमत बालविकास मंच’च्या वतीने हर्षोल्हासात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी पुस्तकातील ज्ञानासोबतच कला, क्रीडा, व्यायाम, स्पर्धा परिक्षा अशा विविध क्षेत्रात यशाचा आलेख उंचावणे हा ‘लोकमत’चा उद्देश आहे. त्याअंतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करण्याची आली होती. काही ठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती तर काही शाळांत फुगे बांधण्यात आले होते. मुलेही छान पोषाखात आली होती. सोबत पालकही होते.
अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात ‘लोकमत’च्या विनंतीवरुन प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव उपस्थित राहिल्या होत्या. त्यांनीही मुलांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि ‘लोकमत’ गेली ६ वर्षे सातत्याने राबवत असलेल्या या उपक्रमाबद्दल ‘लोकमत’चे विशेष कौतुक केले.