वाहन चालवायला शिकणे आता झाले महाग, इंधन दरवाढीचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 02:24 PM2018-09-12T14:24:32+5:302018-09-12T14:32:06+5:30
सातारा जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक व चालक संघाच्या नुकत्याच झालेल्या सभेमध्ये १0 टक्के दरवाढ जाहीर करण्यात आली आहे.
सातारा : वाहनांच्या वाढलेल्या किमती, इंधन दरवाढ, विम्याचे वाढलेले दर, वाहन देखभाल खर्च, कामगारांचे वाढलेले पगार हा आस्थापनेचा ताण वाढल्याने जिल्ह्यातील ड्रायव्हिंग स्कूल चालकांनी दरवाढ केली आहे. सातारा जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक व चालक संघाच्या नुकत्याच झालेल्या सभेमध्ये १0 टक्के दरवाढ जाहीर करण्यात आली आहे.
संघाचे अध्यक्ष शशिकांत धुमाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची सविस्तर माहिती दिली. धुमाळ म्हणाले, शासनाची नवनवीन धोरणे व परिपत्रकांची अंमलबजावणी करत हा व्यवसाय करावा लागत आहे. शासन धोरणानुसार दि. २१ डिसेंबर २0१६ च्या परिपत्रकानुसार शासकीय फीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे.
वाहन चालविण्याचा कच्चा परवाना ज्याची पूर्वीची फी केवळ ३0 रुपये होती, ती वाढवून १९४ रुपये करण्यात आली आहे. वाहन चालविण्याचा पक्का परवाना पूर्वी ९0 रुपयांना मिळत होता. आता त्यासाठी ७६६ रुपये मोजावे लागत आहेत. काही लोक मात्र ड्रायव्हिंग स्कूलमार्फत आकारल्या जाणाऱ्या फीबाबत अपप्रचार करुन गैरसमज पसरवत आहेत.
दरम्यान, ज्यांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण व परवाना मिळवायचा आहे, त्यांनी अधिकृत शासनमान्यता प्राप्त ड्रायव्हिंग स्कूलमार्फतच मिळवावा. प्रशिक्षण व परवाना मिळविण्याबरोबर आपल्या इतर मार्गाने ज्यादा जाणाऱ्या रकमेत बचत करावी व तंत्रशुध्द प्रशिक्षण प्राप्त करावे, असे आवाहनही धुमाळ यांनी केले.
पत्रकार परिषदेला संघाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल कुंभार, सचिव पांडुरंग रेडेकर, प्रशांत पोरे, युसुफ पेंढारी, सतीश वरगंटे, अन्वर पाशाखान, इकबाल पटवेकर, दिलीप पवार, राजेंद्र चव्हाण, श्रृती कुलकर्णी, मधू आठवले, जगदाळे, भोईटे, संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
वाढलेले दर असे
वाहनाचा प्रकार प्रशिक्षण फी (रु.)
- मोटार सायकल ३५00
- अॅटो रिक्षा ४000
- कार ४५00
- जीप ५५00
- ट्रक ८५00
मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश घेताना इच्छुकांनी दलालामार्फत न येता थेट ड्रायव्हिंग स्कूलशी संपर्क साधावा. ड्रायव्हिंग स्कूलची दरवाढ करणे परिस्थितीमुळे भाग पडलेले आहे. लोकांनी मध्यस्थी अथवा दलालांच्यामार्फत न येता मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग स्कूलशी थेट संपर्क साधावा. तर त्यांचे अतिरिक्त पैसे खर्च होणार नाहीत.
- शशिकांत धुमाळ,
अध्यक्ष सातारा जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक व चालक संघ