स्मार्ट डिजिटल वर्गामधून मुलांना हसत खेळत शिक्षण : हत्तीखाना शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:33 PM2018-07-27T23:33:00+5:302018-07-27T23:35:18+5:30
नितीन काळेल ।
सातारा : सध्याच्या स्पर्धेच्या युगात अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय (हत्तीखाना) अग्रेसर ठरत आहे. स्मार्ट डिजिटल वर्गामधून मुलांना हसत खेळत शिक्षण मिळत आहे. विशेष म्हणजे बालसाहित्य संमेलनाबरोबरच विविध उपक्रमही शाळेत दरवर्षी होत असतात.
सातारा एज्युकेशन सोसायटीची अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय ही शाळा सर्व स्तरात आघाडीवर आहे. स्पर्धेच्या युगात ही शाळा गुणवत्ता आणि शैक्षणिक दर्जा कायम टिकवून आहे.
या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. तर या वर्गांच्या तब्बल २४ तुकड्या आहेत. त्यामुळे शेकडो विद्यार्थी या शाळेत ज्ञानार्जन आनंदाने घेत असताना दिसत असतात. शाळेतील अध्यापक वर्ग हा हुशार असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यास सदैव तयार असतो.
या शाळेत गेल्या ४० वर्षांपासून साने गुरुजी कथामाला सुरू आहे. संस्थेच्या चेअरमन डॉ. चेतना माजगावकर, सचिव सी. एन. शहा, सहसचिव डॉ. दीपक ताटपुजे, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचे शाळेकडे नेहमीच लक्ष असते. शालाप्रमुख जयश्री उबाळे, उपशालाप्रमुख अजित साळुंखे व सर्व शिक्षकांचे नेहमीच सहकार्य लाभत असते.
''ऐतिहासिक वास्तूमध्ये भरते शाळा...
१९३७ पासून आजपर्यंत ऐतिहासिक वास्तूमध्ये ही शाळा भरत आहे. संस्थेने या शाळेला १९९० मध्ये तीन मजली इमारत बांधून दिली आहे. या इमारतींमध्ये शेकडो मुलांचे ज्ञानार्जन सुरू असते.
विविध सण साजरे...
शाळा विविध उपक्रम घेते तसेच सणही साजरे करण्यात येतात. रक्षाबंधन, गुरुपौर्णिमा, गणेशोत्सव साजरा होतो. तसेच विविध प्रकारचे खेळ, योगासने, सहलींचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे शाळेत ब्रिटिश कौन्सिल इंग्रजीचे क्लासही घेतले जातात.
सातारा एज्युकेशन सोसायटीच्या या शाळेला मोठा इतिहास आहे. आज या शाळेत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील अनेक विद्यार्थी देश, परदेशात मोठमोठ्या पदावर कार्यरत असून, शाळा नेहमीच प्रगतीपथावर राहिली आहे.
-जयश्री उबाळे, शालाप्रमुख