खेड्यात थोडा उजेड सोडा, अंधार फार झाला...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:24 AM2021-07-19T04:24:22+5:302021-07-19T04:24:22+5:30
ओगलेवाडी : बीज बिलाची रक्कम न भरल्याने महावितरणने ग्रामपंचायतीचे पथदिव्याची वीज जोडणी खंडित केली आहे. यामुळे ग्रामीण भाग अंधारात ...
ओगलेवाडी : बीज बिलाची रक्कम न भरल्याने महावितरणने ग्रामपंचायतीचे पथदिव्याची वीज जोडणी खंडित केली आहे. यामुळे ग्रामीण भाग अंधारात बुडालेला आहे. कोरोनामुळे पंचायतीच्या वसूल कमी झाला आहे. यामुळे सद्या वीज बिल भरणे ग्रामपंचायतीला शक्य नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे शासनाने वीजबिल भरून ग्रामीण भागातील पथदिवे सुरू करावेत आणि ग्रामीण भाग प्रकाशित करावा, अशी मागणी ग्रामीण लोक करीत आहेत.
मागील काही वर्षांत गावातील पथदिव्याचे वीजबिल हे ग्रामविकास खात्यामार्फत मिळणारे अनुदानातून जिल्हाधिकारी भरत होते. मात्र सध्या शासनाने हे वीजबिल ग्रामपंचायतीने भरावे, असा निर्णय केला व तशा सूचना दिल्या आहेत. या सूचनांनंतर महावितरणने वीज बिल भरण्याचा तगादा लावला. ज्या ग्रामपंचायतीनी वीज बिल भरले नाही त्या गावातील पथदिव्याची वीज जोडणी खंडित केली. त्यामुळे ग्रामीण भागात पूर्ण अंधार होत आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत या दिवसात अंधार खूप असतो आणि वीज ही नसल्याने अधिकच अंधार होत आहे.
कोरोनामुळे सर्वाचे उत्पन्न घटले आहे. यामुळे नागरिकांना घरपट्टी पाणीपट्टी आणि इतर कर भरताना अनेक अडचणी येत आहेत. अनेकजण कर भरण्यासाठी अक्षम आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न प्रचंड मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे कोरोनाचा सामना करणे आणि उरलेल्या रकमेतून विकासकामे करायची का वीजबिल भरायचे हा मोठा प्रश्न ग्रामपंचायतीचे समोर उभा आहे. वीजबिलाची रक्कम मोठी असल्याने ती भरणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने वीजबिलाची रक्कम भरावी अशीच मागणी होत आहे. शासनाने याबाबत तातडीने पावले उचलून ग्रामपंचायतीला आणि ग्रामीण भागाला दिलासा द्यावा व पथ पुन्हा एकदा प्रकाशमान व्हावे, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.
चौकट
पथदिव्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.
ग्रामीण भागातील पथदिवे बंद असल्याने आणि सद्या ग्रामपंचायती वीज बिल भरण्यासाठी सक्षम नसल्याने शासनाने तत्काळ वीज रक्कम भरावी आणि हा प्रश्न निकाली काढावा अन्यथा आंदोलन करणार आहे. तहसीलदारांकडे ही लवकरच निवेदन देण्यात येणार आहे.
- रामकृष्ण वेताळ,
सचिव, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा
चौकट 2
शासनाने सहकार्य करावे
सध्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न घटले असल्याने जमा आणि खर्चाचा ताळमेळ घालणे कठीण झाले आहे. उत्पन्न कमी आणि कोरोनाचा भार असे दुहेरी संकट आहे त्यामुळे पूर्वीप्रमाणे शासनाने वीज बिल भरून सहकार्य करावे, अशी मागणी कऱ्हाड तालुक्यातील फत्तेसिंह जाधव सरपंच सैदापूर, ता. कराड