राजकारण राहू दे.. तेवढं लसीकरणाचं बघा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:28 AM2021-06-02T04:28:40+5:302021-06-02T04:28:40+5:30
सातारा : सातारा पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात सध्या लसीकरणावरून वातावरण भलतंच तापलं आहे. दस्तुरखुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनाच या ...
सातारा : सातारा पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात सध्या लसीकरणावरून वातावरण भलतंच तापलं आहे. दस्तुरखुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनाच या प्रकरणात लक्ष घालावं लागलं; परंतु या सर्वातून सातारकरांना मिळालं तरी काय? याचा साधा कोणीच विचार करेना. संकट गंभीर आहे. लोक लसीसाठी भर उन्हात तफडफडत आहेत. हे विदारक चित्र बदलण्यासाठी ‘राजकारण राहू दे बाजूला, आधी लसीकरणात पारदर्शीपणा आणा,’ अशी माफक अपेक्षा सातारकर व्यक्त करू लागलेत.
राज्यासह सातारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लसींचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाची मोहीम धीम्या गतीने सुरू आहे. सातारा पालिकेने कस्तुरबा व गोडोली येथील नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध केली आहे. दोन्ही केंद्रांवर नागरिकांची लसीकरणाची झुंबड उडालेली असते. त्यामुळे सध्यातरी ‘ज्यांना टोकन त्यांना लस’ या पद्धतीने लसीकरण केले जात आहे; परंतु या मोहिमेत पारदर्शीपणा नसल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. डॉक्टरांकडून मर्जीतल्या लोकांना लस दिल्याचा आरोपही रुग्णालयातील आरोग्यसेवकांकडून करण्यात आला. तसेच टोकन एकाला व लस दुसऱ्याला दिली जात असल्याचा प्रकारही काही दिवसांपूर्वीच उघडकीस आला. या प्रकारावरून एका नगरसेवकांनी रुग्णालय प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला.
ही घटना कुठे शांत होतेय तोवर लसीकरणासाठी दमबाजी केल्याच्या आरोपावरून एका नगरसेविकेसह सहा जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांवर मनमानीचा ठपका ठेवत आरोग्यसेवकांनी डॉक्टरांच्या बदलीची मागणी केली. या सर्व प्रकरणावर चक्क खा. उदयनराजे भोसले यांनाच लक्ष घालावे लागले. मात्र, लसीकरणावरून उठलेले वादळ अजूनही शांत झालेले नाही. या सर्व घडामोडी होत असताना सर्वसामान्य सातारकरांना कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. लसीकरणात कोणीही राजकारण आणू नये. उलट यामध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहराला तालुक्याला अधिकाधिक लस कशी मिळेल, यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. मात्र, साताऱ्यात सर्व काही उलट सुरू असल्याने याचा फटका तमाम नागरिकांना बसत आहे. उन्हाच्या झळा सोसूनही अनेकांना लस मिळत नाही. हे कुठेतरी थांबायला हवं, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.
(चौकट)
व्यवस्था सक्षम करा...
सातारा पालिकेने नागरिकांसाठी लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध केली असली तरी ती सक्षम नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळेच लसीकरण केंद्रांवर सातत्याने वादावादीचे प्रकार घडू लागले आहेत. मर्जीतल्या लोकांना लस दिली जाते तसेच वशिलेबाजीचा असे आरोपही आता आरोग्य यंत्रणेवर केला जात आहे. या सर्वांची प्रशासनाने पडताळणी करायला हवी. लसीकरणाची व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच त्यामध्ये पारदर्शीपणा आणणे तितकेच गरजेचे आहे.