गाव सोडलं, जनावरंही विकायला काढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:43 AM2021-08-13T04:43:56+5:302021-08-13T04:43:56+5:30
अतिवृष्टीने डोंगर घसरून दरडी कोसळण्याबरोबरच घरांच्या भिंतींनाही तडे गेल्याने डोंगराच्या कुशीत वसलेल्या जितकरवाडी येथील २३ कुटुंबांतील ९३ जणांनी जिंतीच्या ...
अतिवृष्टीने डोंगर घसरून दरडी कोसळण्याबरोबरच घरांच्या भिंतींनाही तडे गेल्याने डोंगराच्या कुशीत वसलेल्या जितकरवाडी येथील २३ कुटुंबांतील ९३ जणांनी जिंतीच्या माध्यमिक विद्यालयात, धनावडेवाडी व शिंदेवाडीच्या ३२ कुटुंबातील ८५ जणांनी ढेबेवाडीतील मंगल कार्यालयात तर भातडेवाडी येथील २३ पैकी १६ कुटुंबातील ५५ जणांनी जिंतीच्या प्राथमिक शाळेत आश्रय घेतला आहे. बायको, मुलांसह घर सोडून या कुटुंबांनी सुरक्षित ठिकाण गाठले; पण नदी ओलांडून बाहेर पडणे शक्य नसलेली आणि बाहेर आबाळ होईल, या भीतीने घरातच थांबलेली ज्येष्ठ मंडळी तसेच प्रत्येकाच्या घरातील पाळीव जनावरे गावातच अडकून राहिल्याने त्यांच्या काळजीने अनेकजण अस्वस्थ आहेत. काहीजण ज्येष्ठांच्या सेवेबरोबरच जनावरे राखणीसाठी गावीच थांबले असून त्यांच्यासाठी नदीपात्रातून दैनंदिन गरजेच्या वस्तू व औषधे पोहच केली जात आहेत. मोबाइलला रेंज मिळत नसल्याने नदी ओलांडून पलीकडे गेलेला माणूस परत आल्यावरच गावात थांबलेल्यांची खुशाली कळत आहे. शाळा व कार्यालयातील मुक्काम कधी हलेलं, हे सांगणे कठीण असल्याने अनेकांनी दुभती जनावरे विकायला सुरुवात केली आहे.
जनावरे घेऊन जाण्यासाठी पै-पाहुण्यांनाही गळ घातली जात आहे. धनावडेवाडीतील शंकरराव पवार म्हणाले,‘बाहेर पडलेल्याना घरी अडकलेल्या वयस्कर माणसांची व जनावरांची काळजी तर गावात अडकलेल्यांच्या मनात गाव सोडून शाळेत राहिलेल्यांची चिंता अशा विचित्र परिस्थितीतून आम्ही सर्वजण सध्या जात आहोत. दूध ओतून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अजूनही दरडी कोसळतच असून गावच्या डोंगराकडे नजर टाकल्यावर काळजाचा ठोकाच चुकत आहे.’
फोटो : १२केआरडी०२
कॅप्शन : जिंती-जितकरवाडी, ता. पाटण येथील काही कुटुंबांचे गावातच वास्तव्य असल्याने आवश्यक साहित्याची नदीपात्रातून डोक्यावरून ने-आण सुरू आहे.