साताऱ्यात एलईडी पथदिवे : नवीन राहू द्या.. आधी जुन्यांचाच उजेड पाडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 04:07 PM2018-09-11T16:07:39+5:302018-09-11T16:12:02+5:30
सातारा पालिकेने शहरात नवीन एलईडी पथदिवे जरूर बसवावेत; परंतु यापूर्वी बसविण्यात आलेल्या नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती करून त्यांचा उजेड आधी पाडावा, अशी मागणी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी केली.
सातारा : पालिकेने शहरात नवीन एलईडी पथदिवे जरूर बसवावेत; परंतु यापूर्वी बसविण्यात आलेल्या नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती करून त्यांचा उजेड आधी पाडावा. ज्या कंपनीला हा ठेका देण्यात आला आहे, त्या कंपनीकडून उर्वरित काम पूर्ण करून घ्यावे, यानंतरच नवीन ठराव मंजूर करावा, अशी मागणी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी केली. अखेर सत्ताधाऱ्यांनी या विषयावर उपस्थित केलेल्या मुद्द्यांनंतर एलईडीसह अजेंड्यावरील तिन्ही
विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.
नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मंगळवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, महिला व बालकण्याण समिती सभापती अनिता घोरपडे, नियोजन व शहर विकास समिती सभापती स्नेहल नलवडे, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती संगीता आवळे यांच्यासह नगरसेवक, कर्मचारी उपस्थित होते.
न्यायालयाने मूर्ती विसर्जनासाठी मंगळवार तळ्याला परवानगी दिल्याने सभागृहात पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यानंतर सभेला सुरुवात झाली. एलईडी पथदिवे बसविण्याच्या ठराव सभागृहापुढे चर्चेला आल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांनी प्रशासनालाच धारेवर धरले.
पालिकेच्या वतीने यापूर्वी शहरात एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, ज्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे, त्या कंपनीने हे काम अद्याप पूर्ण केले नाही. शहरात एकूण किती एलईडी दिवे बसविण्यात आले, याची कोठेही नोंद नाही.
दिवे बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जात आहेत, असे अनेक प्रश्न विरोधी नगरसेवक अशोक मोने, नगरसेविकास सिद्धी पवार यांनी उपस्थित केले.
नगरसेवक वसंत (अण्णा) लेवे यांनीही संबंधित कंपनीकडून प्रथम उर्वरित काम पूर्ण करून घ्यावे, यानंतर या ठरावावर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. एलईडीच्या ठरावावर सुमारे तासभर चर्चा झाली. अखेर हा विषय बहुमताने मंजूर करण्यात आला. मंगळवार पेठेतील पाण्याच्या हौदाचे सुशोभीकरण करण्याचा ठरावालाही यावेळी मंजुरी देण्यात आली.