सोयीचे मतदारसंघ घेऊन दिग्गज सुरक्षित!

By Admin | Published: February 15, 2017 10:44 PM2017-02-15T22:44:15+5:302017-02-15T22:44:15+5:30

राजकीय सारीपाट : फलटण तालुक्यात बारमाही धडाडणाऱ्या तोफा मात्र आमने-सामनेही नाही

Legendary take away from convenient constituency! | सोयीचे मतदारसंघ घेऊन दिग्गज सुरक्षित!

सोयीचे मतदारसंघ घेऊन दिग्गज सुरक्षित!

googlenewsNext


नसीर शिकलगार ल्ल फलटण
जिल्ह्याच्या राजकारणात फलटण तालुका नेहमीच चर्चेत राहिला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी कायम झडत असतात. परंतु तालुक्यातील सर्वच नेत्यांनी आपल्या सोयीचे मतदारसंघ निवडून तगडा प्रतिस्पर्धी समोर येणार नाही, याचीही काळजी घेऊन स्वत: ‘सेफ झोन’मध्ये गेले आहेत.
तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सात गट खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यामध्ये सात गट महिलांसाठी आरक्षित आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही खुल्या प्रवर्गासाठी असल्याने विविध नेते मंडळींच्या राजकीय आशा-आकांक्षाला अनुसरून उमेदवार या निवडणुकीत येईल, अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे उमेदवारीही आल्या आहेत.
तालुक्यात दोन नाईक-निंबाळकर घराण्यातच निवडणुका व्हायच्या आता भाजपाही त्यात आली आहे. जिल्हा परिषदेसाठी कोणत्या तरी एका मतदार संघात दोन नाईक-निंबाळकर घराण्यातील व्यक्ती समोरासमोर येतील, असे वाटत होते. मात्र, जो-तो सोयीप्रमाणे सुरक्षित मतदारसंघ शोधून उभा राहिला आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार व रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर राष्ट्रवादीकडून तरडगाव मतदार संघातून उभे आहेत. त्यांच्याविरुद्ध स्वाभिमानी पक्षातर्फे अमोल खराडे उभे आहेत. काँग्रेसने हा मतदारसंघ स्वाभिमानीला सोडून त्यांच्याशी आघाडी केली आहे. शिवसेनेतर्फे आकाश गायकवाड हेही उभे आहेत. येथे चुरशीची लढत होत असून, या मतदार संघातून यापूर्वी संजीवराजे यांच्या पत्नी शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर निवडून आल्या होत्या. साखरवाडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीतर्फे शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, काँग्रेसतर्फे रेखा शिंदे यांच्यात लढत होत आहे. मागील निवडणुकीत साखरवाडीतून संजीवराजे नाईक-निंबाळकर राष्ट्रवादीतर्फे निवडून आले होते.
हिंगणगाव गटात ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचे पुत्र धनंजय साळुंखे-पाटील काँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे धैर्यशील अनपट उभे आहेत. भाजप तर्फे सुरेश निंबाळकर तर शिवसेनेकडून नानासाहेब भोईटे मैदानात आहेत.
यंदाच्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष गिरवी गट व त्यातील दोन्ही गणांकडे लागले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघातून काँग्रेसकडून कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पत्नी अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर उभ्या आहेत. त्यांच्या विरोधात माजी आमदार चिमणराव कदम यांचे पुत्र सह्याद्री कदम हे भाजपतर्फे उभे आहेत. सह्याद्री कदम हे या निवडणुकीतून राजकारणात पदार्पण करत आहेत.
या दोघांच्या विरोधात राष्ट्रवादीने रामदास कदम यांना उमेदवारी दिल्याने अतिशय चुरशीची तिरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत जिजामाला नाईक-निंबाळकर व सह्याद्री कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
गिरवी गणातून काँग्रेसकडून दिगंबर आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे उभ्या आहेत. राष्ट्रवादीकडून सीमा गायकवाड तर भाजपकडून अश्विनी अहिवळे यांना उमेदवारी दिली आहे. गिरवी गटातील वाठार निंबाळकर गणातून राष्ट्रवादीने बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांचे पुत्र व रामराजेंचे पुतणे विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देत राजघराण्यातील चौथी पिढी राजकारणात आणली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून विष्णू लोखंडे, भाजपने दिलीपराव पवार, रासपने बाबूराव बिचुकले यांना उमेदवारी दिली आहे.

Web Title: Legendary take away from convenient constituency!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.