कागदपत्रांचा गैरवापर करून कर्जदारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 04:12 PM2020-01-20T16:12:15+5:302020-01-20T16:14:15+5:30
कर्ज मंजूर करून देणाऱ्यांनीच कर्जदारांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून महागडे मोबाईल खरेदी केले असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे बनवेगिरी करणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
सातारा : कर्ज मंजूर करून देणाऱ्यांनीच कर्जदारांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून महागडे मोबाईल खरेदी केले असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे बनवेगिरी करणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
सुनयन सुमंत शुक्ल (वय ३१, रा. बोरगाव, ता. सातारा, मूळ रा. कौलखेड, अकोला), आतिक अफजल शेख (वय ३४, रा. गुरूवार पेठ, सातारा), प्रफुल्ल प्रकाश बुरूंगे (वय २४, रा. मालखेड, पो. बेलवडे. ता. कऱ्हाड ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुनयन शुक्ल हा कर्ज प्रकरणे करणारा एजंट आहे. मागील दोन महिन्यांमध्ये त्याने फियार्दी अमीर फिरोज मुल्ला (रा. गोंदवले, ता. माण) यांच्या आईचे कर्ज प्रकरणासाठी कागदपत्रे घेतली होती.
या कागदपत्रांचा परस्पर गैरवापर करुन मोबाईल खरेदीसाठी एका फायनान्समधून त्याने कर्ज प्रकरण मंजूर केले. ३६ हजार ९९० रुपये किंमतीचा मोबाईल त्याने खरेदी केला होता. याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व पथकाने गुन्ह्यांचा तपास केला. त्यात मुख्य संशयित सुनयन शुक्ल याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केली असता अजूनही तीन साथीदारांचा यात सहभाग असल्याची माहिती समोर आली.
एका फायनान्सचे सेल्स एक्झिकेटीव्ह प्रफुल्ल बुरूंगे, गौतम तोरणे या दोघांनी मदत केल्याचे समोर आले. आतिक शेख याला या प्रकाराची माहिती असतानाही त्याने सुनयन शुक्ल याच्याकडून मोबाइल विकत घेतला. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक केली.
कर्जदारांच्या बँक खात्यातून पैसे कमी झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, हिम्मत दबडे-पाटील, नाईक शैलेश फडतरे, अमित माने, कॉन्स्टेबल स्वप्निल कुंभार, मोहन पवार, पंकज मोहिते यांनी या टोळीचा पदार्फाश केला.
चार लाखांची फसवणूक..
बनावट कागदपत्रे करून फसवणूक झालेले अद्यापपर्यंत आठ साक्षीदार समोर आले आहेत. या सर्वांची ४ लाख ३२ हजार ९५० रुपयांची फसवणूक झाली आहे. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.