लेंगा-शर्ट, टोपी घालून लावला खुनाचा छडा..!
By admin | Published: October 16, 2015 09:45 PM2015-10-16T21:45:35+5:302015-10-16T22:44:52+5:30
वडापाव खाऊन टेहाळणी : दाढीचे खुंट वाढवून गर्दूल्ल्याचे सोंग
दत्ता यादव -- सातारा पोलिसांना घटनास्थळी प्रत्यक्ष साक्षीदार अथवा एकही पुरावा सापडत नाही. त्यावेळी अशा गुन्ह्याची उकल न होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेच मग पोलिसांना स्वत:च्या वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून गुन्हेगारापर्यंत पोहोचावे लागते. असाच काहीसा प्रकार वापरून स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार मोहन घोरपडे यांनी राजवाड्याजवळ घडलेल्या खून प्रकरणाचा छडा लावला. घोरपडे यांनी सलग चार दिवस खाकी वर्दी उतरून लेंगा-शर्ट, टोपी, असा वेश परिधान केला. एवढेच नव्हे, तर दाढीचे खुंट वाढवून त्यांनी गर्दूला असल्याचेही भासवले. वेळप्रसंगी भेळ, वडापाव खाऊन दिवसभर अड्ड्यावर फिरून खून प्रकरणाचा छडा लावल्याने इतर प्रकरणांमध्ये कसा तपास करावा, हे घोरपडे यांनी केलेल्या तपासातून इतर पोलिसांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
राजवाड्याजवळ सहा दिवसांपूर्वी दिलीप कदम (वय ५४, रा. वाघळी पोस्ट बामणोली) यांचा अज्ञातांनी खून केल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी त्यांच्या टीमला सूचना देऊन वेगवेगळ्या पातळीवर माहिती घेण्यास सांगितले. या टीममध्ये मोहन घोरपडेही होते. ज्या ठिकाणी खून झाला. ती जागा गर्दुलांचा अड्डा असल्याचे घोरपडे यांना समजले. दिवसा आणि रात्री त्या ठिकाणी बरेचजण ‘तलफ’ भागविण्यासाठी येत असल्याचेही आणखी माहिती मिळाली. त्यामुळे घोरपडे यांनी सलग चार दिवस खाकी वर्दी उतरून लेंगा-शर्ट, टोपी, असा वेश परिधान केला. दाढीचे खुंट वाढवून त्यांनी गर्दूला असल्याचेही भासवले. बुधवारी रात्री दोन गर्दुले त्यांच्या शेजारी बसले होते. दिलीप कदम यांना रोहित आणि शांतारामने कसे मारले, याची चर्चा ते करत होते. त्या दोघांच्या बोलण्यातून आरोपींची नावेही समजली. त्यावेळी गर्दुले सांगत असलेले आरोपी सराईत असल्याचे समजताच पोलीस खात्याने आरोपींना उचलले.
पोलीस असल्याची ओळख सांगून अशा प्रकरणात माहिती मिळण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे त्यांनी वेशांतर करून त्या ठिकाणी टेहाळणी करण्याचा निर्णय घेतला. लेंगा-शर्ट, टोपी घालून त्यांनी त्या ठिकाणी बसण्यास सुरुवात केली. हातात भेळ, दाढीचे वाढलेले खुंट यामुळे त्यांना कोणी पोलीस आहे, हे ओळखणे शक्यच नव्हते.