घरासमोर श्वानावर बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:38 AM2021-04-27T04:38:48+5:302021-04-27T04:38:48+5:30
लोटळेवाडी परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत आहे. अनेकांना यापूर्वी बिबट्याचे दर्शन झाले आहे. गावातील रंगराव कदम यांचे ...
लोटळेवाडी परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत आहे. अनेकांना यापूर्वी बिबट्याचे दर्शन झाले आहे. गावातील रंगराव कदम यांचे पाळीव श्वान नेहमीप्रमाणे घरासमोर बसले होते. बुधवारी, दि. २१ बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला तेथून ओढत नेले. काही वेळानंतर कदम कुटुंबीय घराबाहेर आले असता त्यांना त्यांचे पाळीव श्वान दिसले नाही. त्यामुळे त्यांनी परिसरात शोध घेतला असता डोंगरालगत श्वानाचे अवशेष आढळून आले. लोटळेवाडी हे गाव डोंगरपायथ्याशी असल्याने येथे नेहमीच वन्यप्राण्यांचा उपद्रव जाणवतो. बिबट्या, वानर, गवा, रानडुक्कर अशा अनेक प्राण्यांचा नेहमीच येथील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. आता तर चक्क बिबट्या मानवी वस्तीत शिरकाव करीत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पाळीव जनावरांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.