साताऱ्यात बिबट्या थेट घरातच घुसला, कुत्र्याने भुंकताच पळत सुटला
By महेश गलांडे | Published: December 23, 2020 03:13 PM2020-12-23T15:13:59+5:302020-12-23T15:18:06+5:30
सातारा जिल्ह्यातही मंगळवारी रात्री बिबट्या आढळून आला, हा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या बिबट्याने चक्क घरातच प्रवेश केला होता, सुदैवाने कुणीही मनुष्य तेथे नसल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही.
सातारा - राज्यातील अनेक भागांता गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत पसरली आहे. त्यातच, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील बिबट्याने तब्बल 9 बळी घेतल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. अखेर, या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वनविभागाला यश आले आहे. करमाळ्यातील बिटरगाव-वांगी परिसरात बिबट्याला ठार करण्यात आले. तीन बाजूला पाणी आणि एका बाजूला शूटर थांबवून बिबट्याची कोंडी करण्यात आली. त्यामुळे बिबट्याला दुसरीकडे जाणे शक्य नव्हते. या परिस्थितीत शूटरने बिबट्याला ठार केले, त्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला. मात्र, अद्यापही बिबट्याची दहशत कायम आहे.
सातारा जिल्ह्यातही मंगळवारी रात्री बिबट्या आढळून आला, हा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या बिबट्याने चक्क घरातच प्रवेश केला होता, सुदैवाने कुणीही मनुष्य तेथे नसल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही. मात्र, बिबट्याच्या गृहप्रवेशाची चर्चा गावात चांगलीच रंगली आहे. कराडजवळील काले गावात बिबट्या अगदी घरातच घुसल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. रात्रीच्या अंधारात अलगदपणे बिबट्या पायऱ्या चढून घरात शिरला. बिबट्याला पाहताच दाराबाहेर असलेल्या कुत्र्याने भुंकण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळी, बिबट्या एकटक नजरेने कुत्र्यावर निशाणा रोखून होता. पण, कुत्र्याने पुढे येऊन भुंकण्यास सुरुवात केल्यानंतर बिबट्याने घरातून बाहेरच्या दिशेने धूम ठोकली. घराबाहेरील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे. त्यामुळे, गाव-परिसरात या बिबट्याची चांगलीच दहशत बसली आहे. स्थानिक प्रशासन आणि वन विभागाला सतर्क करण्यात आले असून बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, करमाळ्यात नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आले, तरीही गावकऱ्यांमध्ये दहशत कायम आहे.
करमाळ्यात ठार केलेला बिबट्या नरभक्षक
येथे ठार करण्यात आलेला बिबट्या हा नर होता. त्याची पूर्ण वाढ झालेली असून, वय अंदाजे सहा ते सात वर्षे इतके होते. त्याची शेपटीसह लांबीही सहा फूट इतकी होती. बिबट्याविषयी खूप अफवा पसरल्या आहेत. तीन डिसेंबरपासून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. ज्या परिसरात त्याला ठार केले त्याच परिसरात त्याने काही दिवसांपूर्वी हल्ला केला होता. त्याच्याविषयीच्या माहितीचे अॅनालिसिस करण्यात आले. त्याच्या पायांच्या ठशांमुळे (पगमार्क) नरभक्षक असलेला बिबट्या हा तोच असल्याचे सिद्ध झाले. रोज सरासरी आठ किलोमीटर तो प्रवास करत होता. सोलापुरातील केळी व उसाच्या शेतात आल्यावर तो घुटमळला, त्यामुळे तो फक्त एक ते दीड किलोमीटर फिरत होता.