Satara: बिबट्याचा बछडा विहिरीत पडला; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
By संजय पाटील | Published: December 2, 2023 11:58 AM2023-12-02T11:58:10+5:302023-12-02T11:58:35+5:30
परिसरात मादी बिबट्याचा वावर असावा, अशी शक्यता असल्यामुळे खबरदारी घेत हे 'रेस्क्यू ऑपरेशन' सुरू
कऱ्हाड : भक्षाच्या शोधात भटकणारा बिबट्याचा बछडा थेट विहिरीत कोसळला. गमेवाडी, ता. कऱ्हाड येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली. संबंधित बछड्याने विहिरीच्या काठावर आश्रय घेतला असून त्याला वाचविण्यासाठी वन विभागाचे पथक पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र, परिसरात मादी बिबट्याचा वावर असावा, अशी शक्यता असल्यामुळे खबरदारी घेत हे 'रेस्क्यू ऑपरेशन' सुरू करण्यात आले आहे.
कऱ्हाड तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये सध्या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातच शिवारात ऊसतोड सुरू असल्यामुळे बिबट्यांसह त्यांचे बछडे निवाऱ्यासाठी शिवारात भटकत आहेत. अशातच शनिवारी सकाळी साजूर ते गमेवाडी जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या विहिरीत बिबट्याचा बछडा पडला असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. संबंधित बछडा विहिरीच्या आतमध्ये काठावर बसून होता.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी गर्दी केली. तसेच याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनाधिकारी व कर्मचारी पिंजऱ्यासह त्याठिकाणी दाखल झाले. बछडा ज्या विहिरीत पडला आहे, ती विहीर बांधव आहे. त्यामुळे बछड्याला वाचविण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात येणार आहे. तशा हालचाली वनविभागाने सुरू केल्या आहेत.
दरम्यान, बछडा लहान असल्यामुळे मादी बिबट्या त्याच परिसरात वावरत असावा, अशी शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी घेत रेस्क्यू ऑपरेशन राबविले जात असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.