देवदरी घाटात बिबट्या आला रे...,वाहनधारकांकडून वावड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 12:51 PM2021-07-12T12:51:51+5:302021-07-12T12:53:53+5:30
Leopard ForestDepartment Satara : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-वडूज रस्त्यावरील अंभेरी येथील देवदरी घाटात बिबट्या दिसल्याच्या वावड्या वाहनधारकांकडून उठवल्या जात आहेत. मात्र वनविभागाने या वावडय़ांचे खंडन करून तो प्राणी तरस असल्याचे म्हटले आहे.
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-वडूज रस्त्यावरील अंभेरी येथील देवदरी घाटात बिबट्या दिसल्याच्या वावड्या वाहनधारकांकडून उठवल्या जात आहेत. मात्र वनविभागाने या वावडय़ांचे खंडन करून तो प्राणी तरस असल्याचे म्हटले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अंभेरी येथील देवदरी घाट परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. एका वाहनधारकाने गाडीतूनच रात्रीच्या सुमारास घाटातील रस्त्याच्या बाजूला उभा राहिलेल्या प्राण्याचा फोटो काढून सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे.
याबरोबरच फोटोमधील प्राणी हा बिबट्याच असल्याचा दावा संबंधित वाहनधारकाने केला आहे. फोटो दूर अंतरावरील आणि अंधारातील असल्यामुळे प्राण्यांची ओळख फोटोतून अचूकपणे होत नाही. परंतु सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सदर मेसेज व्हायरल झाल्यामुळे नागरिकांत कुतुहलाबरोबरच भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान याबाबत रहिमतपूर वनरक्षक नवनाथ कोळेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ह्यया परिसरात बिबट्याचा वावर नसल्याचे स्पष्ट केले. तसेच यापूर्वीही देवदरी घाट परिसर, अपशिंगे व पवारवाडी या भागातील काही शेतकऱ्यांनी शेतातून ये जा करताना रात्रीचा बिबट्या दिसला असल्याच्या वावड्या उठल्या होत्या.
मात्र त्यावेळी पाहणी केली असता तरसाच्या पायाचे ठसे दिसून आले होते. त्यामुळे सध्या समाज माध्यमांवर जो काही फोटो आणि माहिती पसरवली जात आहे. तो प्राणी बिबट्या नसून तरस आहे. शेतकरी व वाहनधारकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.ह्ण