बिबट्या घरात घुसला
By admin | Published: July 7, 2016 11:13 PM2016-07-07T23:13:57+5:302016-07-07T23:24:38+5:30
अकोले : आतापर्यंत जंगलातून वस्तीपर्यंत आलेल्या बिबट्याची मजल थेट घरात घुसण्यापर्यंत झाली आहे. गुरूवारी सायंकाळी इंदोरी येथील एका घरात बिबट्या थेट घरात घुसला.
अकोले : आतापर्यंत जंगलातून वस्तीपर्यंत आलेल्या बिबट्याची मजल थेट घरात घुसण्यापर्यंत झाली आहे. गुरूवारी सायंकाळी इंदोरी येथील एका घरात बिबट्या थेट घरात घुसला. साक्षात काळ डोळ्यासमोर पाहून घरातील तिघी मायलेकी जीवाच्या आकांताने ओरडल्या. त्यामुळे बिबट्याने घरातून पळ काढला अन् त्या मायलेकींनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास इंदोरी गावालगत असलेल्या आवारी वस्तीत मांजरीचा पाठीलाग करत असताना बिबट्या थेट संपत खंडू नवले यांच्या घरात घुसला. घरात मंगल संपत नवले व त्यांच्या दोन मुली होत्या. साक्षात समोर बिबट्या दिसल्याने त्यांची पाचावर धारण बसली. जीवाच्या आकांताने त्यांनी किंकाळी फोडली. त्यामुळे शेजारी गोळा झाले. त्यापूर्वी बिबट्याने हेमंत आवारी यांच्या ओट्यावरुन झेप घेत शेजारच्या उसाच्या शेतात घूम ठोकली. त्यानंतर गावकऱ्यांनी फटाके वाजवून बिबट्याला शेतातून पळवून लावले.
इंदोरी परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत नेहे यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. बिबट्याचे दिवसा दर्शन होऊ लागल्याने गावकरी भयभीत झाले असून वन खात्याने पिंजरे लावावेत, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)