बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 11:58 PM2017-07-19T23:58:01+5:302017-07-19T23:58:01+5:30

बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात जेरबंद

Leopard feather | बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात जेरबंद

बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात जेरबंद

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड/मलकापूर : वाठार, ता. कऱ्हाड येथील जुजारवाडी परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्याचा बछडा जेरबंद झाला आहे. बुधवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
याबाबतची खबर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. तातडीने वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, बिबट्या पिंजऱ्यात सापडल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
वाठार-जुजारवाडी, ता. कऱ्हाड परिसरात मादीसह दोन बछड्यांचा वावर असून, मंगळवारी बिबट्याने थेट लोकवस्तीकडेच आपला मोर्चा वळवला होता. ग्रामस्थांसमोर रस्ता ओलांडून तो सुरुवातीला झाडीत गेला. आणि काहीवेळातच झाडीतून बाहेर येऊन त्याने एका बंगल्याशेजारी ठाण मांडले. अवघ्या काही फुटांवर बिनधास्त वावरणाऱ्या बिबट्याला पाहून ग्रामस्थांचे धाबे दणाणले. मंगळवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्या लोकवस्तीत वावरू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शेकडो ग्रामस्थांनी बिबट्याचा वावर असलेल्या परिसराला वेढा दिला. मात्र, बिबट्या सर्वांसमोरून बेधडक वावरत असल्याचे चित्र त्याठिकाणी पाहायला मिळाले. कधी उसाच्या शेतात, कधी झाडावर अनेकांना बिबट्याची बछडी दिसून आली.
सोमवारी रात्री माळावरच्या वस्तीवरील अधिकराव पाटील यांच्या मालकीच्या पाळीव कुत्र्यासह एक शेळी बिबट्याने फस्त केले होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी भीती पसरली होती. त्यातच मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ दैनंदिन कामात व्यस्त असताना अचानक बिबट्याने सर्वांसमोरून रस्ता ओलांडला. पलीकडील झाडीत जाऊन तो पसार झाला. अचानक बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांची भीतीने गाळण उडाली. काहीजण तेथून सुरक्षित ठिकाणी धावले. तर काहींनी घरांचे दरवाजेच बंद करून घेतले. काही वेळानंतर बिबट्या एका बंगल्यानजीक झाडीतून बाहेर आला. त्याठिकाणीच झाडाखाली त्याने ठाण मांडले. पंधरा ते वीस मिनिटे तो त्याठिकाणी थांबून होता. त्यामुळे ग्रामस्थांमधील भीती आणखीनच वाढली. काही ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वन अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले.
मंगळवारचा दिवसभरातील बिबट्याचा वावर पाहता वनविभागाने दत्ता साळवे यांच्या वस्तीजवळ मानेवस्तीजवळ बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावण्याचे ठरवले. सायंकाळी साळवे यांच्या वस्तीजवळ पिंजरा लावण्यात आला. पिंजऱ्याच्या एका कप्प्यात भक्ष म्हणून एका कुत्र्याच्या पिलाला ठेवण्यात आले होते.
बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दत्ता साळवे वस्तीवर गेले असता पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असल्याचे निदर्शनास आले. याबाबतची खबर साळवे यांनी कांही ग्रामस्थांसह वनविभागाला दिली. सहायक वनसंरक्षक तानाजी गायकवाड, कऱ्हाड वनक्षेत्रपाल बी. एस. शिंदे, फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल संदीप गवारे, नांदगाव वनरक्षक योगेश पाटील, बी. बी. बर्गे, मलकापूर वनपाल संतोष जाधवर, हणमंत मिठारे, मसूर वनरक्षक एस. जी. सुतार, किवळ वनरक्षक बी. एस. कदम यांच्यासह
कर्मचारी तातडीने साळवे वस्तीवर दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा रस्त्यावर आणण्यात आला. बिबट्याचा बछडा जेरबंद झालेल्या पिंजऱ्यासह बिबट्याला ताब्यात घेतले. बिबट्यासह पिंजरा टेम्पोत घालून वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले.
बिबट्या सापडला; पण दहशत कायम
जुजारवाडी-वाठार येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबद्द झाला असला तरी आणखी एक बछडा व बिबट्याची मादी या परिसरातच वावरत आहे. त्यामुळे एक बिबट्या सापडला म्हणून काय झाले आणखी दोन शिल्लक बिबट्यांचा लोकवस्तीत राजरोसपणे वावर असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांच्यात दहशत मात्र कायम आहे, अशी चर्चा घटनास्थळी होती.
ग्रामस्थांनी सावधानता बाळगण्याचे वनअधिकाऱ्यांचे आवाहन
बिबट्या स्वत:हून कधीही हल्ला करीत नाही. एक बिबट्याचा बछडा सापडला आहे. अजून मादीसह एक बछड्याचा परिसरात वावर आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी त्याला हुसकावण्याचा किंवा तो दिसताच धावपळ करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वनअधिकाऱ्यानी केले आहे.
बिबट्याच्या बछड्याचे वय दहा महिने
जुजारवाडी-वाठार येथे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला होता. त्या पिंजऱ्यात पहिल्याच रात्री एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. पिंजऱ्यात सापडलेला बिबट्या हा अंदाजे नऊ ते दहा महिने वयाचा असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Leopard feather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.