साताऱ्यात बिबट्याची दहशत कायम, आंबवडे विभागात जनावरांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 03:41 PM2021-12-09T15:41:14+5:302021-12-09T15:42:49+5:30
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. मानवी वस्तीत शिरकाव करत बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यावर हल्ले चढवले आहेत.
तळमावले : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. मानवी वस्तीत शिरकाव करत बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यावर हल्ले चढवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपुर्वी आंबवडे खुर्द येथे रामचंद्र लक्ष्मण सुर्वे यांच्या मालकीच्या शेळीवर बिबट्याने हल्ला चढवून तिचा फडशा पाडला.
आंबवडे खुर्द येथील शेतकरी रामचंद्र सुर्वे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या घेऊन जवळच असलेल्या चिवटाचा माळ नावाच्या रानात चरण्यासाठी गेले होते. दुपारी अचानक बिबट्याने शेळीवर झडप घालून फरपटत शिवारात नेले. सुर्वे यांनी बिबट्या गेलेल्या दिशेला शोध घेतला असता त्यांना शेळी सापडली नाही.
दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी डोंगरात जाऊन शोध घेतला असता अर्धवट खाल्लेली शेळी त्यांना सापडली. याबाबत त्यांनी वन विभागाला माहिती दिली असून पंचनामा करण्यात आला आहे. ग्रामस्थांमधून या बिबट्याला तात्काळ पिंजरा लावून जेरबंद करण्याची मागणी होत आहे.
परिसरामध्ये अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर आहे. येथे ग्रामस्थ शेतामध्ये काम करतात. शिवाराचे क्षेत्र मोठे असल्यामुळे शेतातील कामे नेहमीच सुरू असतात. त्यातच शिवारात बिबट्याकडून हल्ल्याच्या घटना वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुटीत घेवून जगावे लागत आहे. मानवी वस्तीमध्ये जंगली प्राण्याचा वावर वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.