Satara: वराडे गावात बिबट्याचा धुमाकूळ, पुन्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाला कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 03:51 PM2023-09-26T15:51:08+5:302023-09-26T15:51:55+5:30
अजय जाधव उंब्रज: कऱ्हाड तालुक्यातील वराडे गावात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ...
अजय जाधव
उंब्रज: कऱ्हाड तालुक्यातील वराडे गावात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वराडेत यापूर्वीच तब्बल तीन बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याने याआधीच गावातील अनेक पाळीव कुत्री फस्त केली आहेत. अनेक महिन्यांपासून येथील डोंगर परिसरात बिबट्यांचा वावर आहे. मात्र आता बिबटे लोक वस्तीत बिनधास्त वावरू लागले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभागाचे स्वतंत्र कार्यालय वराडे येथे आहे. मात्र बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नाहीत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून शिवारातील कामे खोळंबली आहेत. महिन्यांपूर्वी एका दुचाकीस्वारांचा बिबट्याने पाठलाग केला. तसेच एका युवकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. ऐन गणेशोत्सवात चारच दिवसांपुर्वी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास गावात बिबट्या शिरला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी आरडाओरडा केला. दरम्यान वराडे ग्रामपंचायतीनेही या संदर्भात वनविभागाकडे पत्रव्यवहार करुन बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
गावात पिंजरे लावण्याची मागणी
तीन वर्षांपूर्वी वराडे येथे डोंगर पायथ्याशी बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. मात्र बिबट्याने हुलकावणी दिली. दरम्यान मागील काही दिवसापासून पुन्हा बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांच्या घबराटीचे वातावरण आहे. गावात पुन्हा पिंजरे लावण्याची मागणी होत आहे.