केळोली विभागात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:12 AM2021-03-04T05:12:35+5:302021-03-04T05:12:35+5:30
वरची केळोली येथील शंकर मोरे यांच्या घराशेजारील शेडमध्ये बांधलेल्या वासरावर रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवून ठार केले. या घटनेमुळे ...
वरची केळोली येथील शंकर मोरे यांच्या घराशेजारील शेडमध्ये बांधलेल्या वासरावर रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवून ठार केले. या घटनेमुळे केळोलीसह परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांमधे भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी शेतात जाताना भीतीच्या छायेखाली वावरताना दिसून येत आहेत. केळोली गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले असल्याने गावाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडी आहे. याठिकाणी अनेक जंगली प्राणी डोंगरात रात्रंदिवस शेतकऱ्यांच्या नजरेस पडत आहेत. या परिसरात सतत बिबट्या शेळ्यांवर हल्ला करीत आहे.
केळोली व परिसरात गत अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांना दिसून आले आहे. यापूर्वीही अनेक शेळ्या, पाळीव श्वान बिबट्याने फस्त केले आहेत. बुधवारी बिबट्याने रात्रीच्या सुमारास वासरावर हल्ला चढवल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ भयभीत झाले असून वनविभागाने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घटनास्थळी वनाधिकारी अविनाश जाधव यांनी धाव घेऊन पंचनामा केला.