आठ हजार हेक्टरवर बिबट्याचे भ्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:03+5:302021-06-10T04:26:03+5:30

कऱ्हाड : तालुक्यात वनक्षेत्र जास्त आहे आणि या वनक्षेत्रातील तब्बल आठ हजार हेक्टर म्हणजेच एकूण क्षेत्राच्या निम्म्याहून जास्त क्षेत्रावर ...

Leopard travels over 8,000 hectares! | आठ हजार हेक्टरवर बिबट्याचे भ्रमण!

आठ हजार हेक्टरवर बिबट्याचे भ्रमण!

Next

कऱ्हाड : तालुक्यात वनक्षेत्र जास्त आहे आणि या वनक्षेत्रातील तब्बल आठ हजार हेक्टर म्हणजेच एकूण क्षेत्राच्या निम्म्याहून जास्त क्षेत्रावर बिबट्याची भ्रमंती सुरू असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. वराडे, मलकापूर आणि कोळे परिमंडलात त्याचा जास्त वावर असून, इतर ठिकाणीही बिबट्याची भटकंती वारंवार अधोरेखित झाली आहे.

कऱ्हाड तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये बिबट्यांचे दर्शन होत आहे. काही वर्षांपूर्वी तालुक्यात पाठरवाडी, डेळेवाडी, आरेवाडी, गमेवाडी, चचेगाव, विंग, आणे, येणके या भागातच बिबट्या आढळत होता. मात्र, कालांतराने या गावांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्या दृष्टीस पडला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. सध्या बिबट्यांचा वावर एवढा वाढलाय की, तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कुठे ना कुठे बिबट्या दिसल्याचे सांगितले जाते. वन विभागानेही तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याचे स्पष्ट केले आहे.

बिबट्या हा स्थलांतर करणारा प्राणी आहे. वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो चोवीस तासात सुमारे पन्नास किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतो. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यात सध्या किती बिबट्या वावरताहेत, हे निश्चितपणे कोणीही सांगू शकत नाही. मात्र, ज्या-ज्या ठिकाणी बिबट्या दृष्टीस पडला अथवा त्याच्या अधिवासाचे पुरावे सापडले, त्या परिसराची नोंद वन विभागाकडून ठेवली जाते. त्यानुसार तालुक्यातील सुमारे ८ हजार हेक्टर वनक्षेत्रात बिबट्या वावरल्याचे वन विभाग सांगतो. भविष्यात हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- चौकट

वनहद्दीची चार परिमंडलात विभागणी

कऱ्हाड वन विभागाच्या हद्दीत १३ हजार १५३ हेक्टर वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्राच्या देखरेखीसाठी चार परिमंडलात विभागणी करण्यात आली आहे. मलकापूर, कोळे, वराडे आणि मसूर या मंडलांच्या माध्यमातून तालुक्यातील वनक्षेत्राची देखरेख केली जाते. या चार मंडलांपैकी मसूर वगळता इतर तीन मंडलांमध्ये बिबट्याचा वावर अधोरेखित झाला आहे.

- चौकट

कऱ्हाड वन विभागाचे क्षेत्र

राखीव क्षेत्र : १२,५८५.५७ हेक्टर

अवर्गित क्षेत्र : १४.६५ हेक्टर

संपादित क्षेत्र : ५५३.६७ हेक्टर

संरक्षित क्षेत्र : ०.० हेक्टर

एकूण क्षेत्र : १३,१५३.७९ हेक्टर

- चौकट

बीटनिहाय बिबट्याप्रवण क्षेत्र

मलकापूर : ८९६

नांदगाव : ७२८

कोळे : १०३९.४२

कासारशिरंबे : ५८५.११०

तांबवे : ९००.९२

म्हासोली : ८३२.५२

वराडे : १२८४.४००

म्होप्रे : ९१६.१८०

चोरे : ९४८.३२७

(सर्व क्षेत्र हेक्टरमध्ये)

- कोट

कऱ्हाड वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर आहे. खासगी क्षेत्रातही तो वावरत आहे. प्रादेशिक वनहद्दीतील बिबट्यांची संख्या मोजता येऊ शकत नाही. त्यामुळे हद्दीत किती बिबट्यांचा वावर आहे, हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे.

- अर्जुन गंबरे

परिक्षेत्र वन अधिकारी, कऱ्हाड

फोटो : ०९ केआरडी ०२

कॅप्शन : प्रतिकात्मक

Web Title: Leopard travels over 8,000 hectares!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.