सातारा: कोळे येथे भरवस्तीत घुसून बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला, दोन ठार
By प्रशांत कोळी | Published: October 13, 2022 05:11 PM2022-10-13T17:11:01+5:302022-10-13T17:11:37+5:30
शेडच्या सभोवतालची पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळे येथे भरवस्तीत घुसून बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्या जागीच ठार झाल्याने परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोळे येथील पाटील मळ्यात गणेश शंकर पाटील यांचे घर आहे. घराला लागून जनावरांचे शेड आहे. नेहमीप्रमाणे सकाळी ते शेडमध्ये गेले असता दोन शेळ्या अर्ध खाल्लेल्या मृतावस्थेत पडलेल्या निदर्शनास आल्या. शेडला दरवाजा नसल्याने वन्य प्राण्यांकडून हल्ला झाला असावा, असा कयास झाला. त्यानंतर पाटील यांनी याबाबत कोळे वनविभागास माहिती दिली.
माहिती मिळताच वनपाल बाबूराव कदम, वनरक्षक शंकर राठोड, वनसेवक अरुण शिबे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी शेडच्या सभोवतालची पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. ज्या पद्धतीने शेळीवर हल्ला केला होता ती पद्धत आणि पायाचे ठसे यावरून बिबट्यानेच हल्ल्या केल्याचे निष्पन्न झाले.