घागरेवाडीतील बिबट्या अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 03:44 PM2020-06-19T15:44:08+5:302020-06-19T15:45:51+5:30
घागरेवाडी ( ता.शिराळा ) येथे चौगुले गल्लीतील दिलीप घागरे व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या गोठ्यात घुसलेल्या बिबट्यास शुक्रवारी रात्री साडे बारा वाजता वनविभागाने सापळा लावून जेरबंद केले. जवळपास दिडतास हे आॅपरेशन सुरू होते.
विकास शहा
शिराळा : घागरेवाडी ( ता.शिराळा ) येथे चौगुले गल्लीतील दिलीप घागरे व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या गोठ्यात घुसलेल्या बिबट्यास शुक्रवारी रात्री साडे बारा वाजता वनविभागाने सापळा लावून जेरबंद केले. जवळपास दिडतास हे आॅपरेशन सुरू होते.
गुरूवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान कुत्री पाठीमागे लागल्याने बिबट्या गल्लीमध्ये घुसला होता. त्यावेळी गल्लीतील लोकांनी दंगा केल्याने जवळच असणाऱ्या दिलीप व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या शेडमध्ये घुसला . याबाबत ग्रामस्थ व जयवंत चौगुले यांनी वन विभागांशी संपर्क साधला.
वनक्षेत्रपाल सुशांत काळे , सामाजिक वनीकरण वनक्षेत्रपाल रविकांत भगत , वनपाल चंद्रकांत देशमुख , वनरक्षक सचिन पाटील , पी.एन.पाटील, देवकी ताहसीलदार , रेहना पाटोळे , अमोल साठे , वनकर्मचारी संपत देसाई , शहाजी पाटील , आदिक शेटके , अनिल पाटील , दादा शेटके , बाबा गायकवाड , बाळू चव्हाण , शिवाजी खोत , तानाजी पाटील , पोलीस कर्मचारी विकास नांगरे ,पोलीस पाटील मोहन घागरे , सरपंच उषा घागरे ,अशोक घागरे ,मारुती घागरे ,रोहित घागरे,बजरंग घागरे,आनंदा घागरे , सुशांत जाधव , शरद पाटील , जगदाळे , सुभाष जाधव व इतर कर्मचारी ,ग्रामस्थ यांच्या प्रयत्नाने हा बिबट्या जेरबंद झाला.
त्यानंतर गोठ्यातील सात जनावरे बाहेर काढण्यात आली . ज्याठिकाणी बिबट्या होता त्याठिकाणी जाळी लावण्यात आली होती. रात्री साडे दहा वाजता शिराळा येथून सापळा आणण्यात आला . त्यानंतर दिड तासाच्या अथक प्रयत्नाने रात्री साडे बारा वाजता बिबट्यास जेरबंद केले . त्यामुळे ग्रामस्थांनी व वन विभागाने सुटकेचा श्वास सोडला .