बिबट्याचा वाढला वावर;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:40 AM2021-02-24T04:40:23+5:302021-02-24T04:40:23+5:30
संजय पाटील कऱ्हाड : ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’, असं म्हणतात; पण सध्या ध्यानी-मनी नसताना कुठेही बिबट्याचं दर्शन होतंय. ...
संजय पाटील
कऱ्हाड : ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’, असं म्हणतात; पण सध्या ध्यानी-मनी नसताना कुठेही बिबट्याचं दर्शन होतंय. डोंगराच्या पायथ्याला, गावाच्या वेशीवर, एवढेच नव्हे तर मानवी वस्तीतही आता बिबट्या वावरतोय. या हिंस्त्र श्वापदाचा वावर वाढला असताना त्याला पकडण्यासाठी वन व वन्यजीव विभागाकडे कोणतीही तातडीची उपाययोजना नाही. अद्यापही हे दोन्ही विभाग फक्त पिंजऱ्याच्याच भरवशावर आहेत.
कऱ्हाडसह पाटण तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये बिबट्यांचा वावर आहे. अनेक ठिकाणी त्याने पाळीव प्राण्यांसह ग्रामस्थांवरही हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी कऱ्हाड तालुक्यातील पाठरवाडी, डेळेवाडी, आरेवाडी, गमेवाडी, चचेगाव, विंग, आणे, येणके या भागातच बिबट्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जायचे. मात्र, कालांतराने या गावांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्या दृष्टीस पडला. त्याने मानवी वस्तीत घुसून अनेक पाळीव जनावरांवर हल्ले केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. सध्या बिबट्यांचा वावर एवढा वाढला आहे की, कऱ्हाडसह पाटण तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कुठे ना कुठे बिबट्या दिसल्याचे सांगितले जाते. वनविभागानेही दोन्ही तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याचे स्पष्ट केले आहे; पण बिबट्या मानवी वस्तीत घुसला अथवा एखाद्या ठिकाणी अडकला तर त्याला पकडून सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी वन खात्याकडे कोणतीही तातडीची उपाययोजना नाही. वन खात्याकडे फक्त लोखंडी पिंजरे, दोरखंड, वागर व जाळी एवढेच साहित्य आहे. या साहित्याच्या आधारे बिबट्याला पकडणे वन खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहजशक्य नाही.
वन व वन्यजीव विभागाला साहित्याअभावी बिबट्या पकडता येत नाही. परिणामी, मानवी वस्तीत घुसलेल्या अथवा एखाद्या ठिकाणी अडकलेल्या बिबट्याला आपला जीव गमवावा लागतो. यापूर्वी अशा काही घटना घडल्या आहेत. बिबट्यांची वाढती संख्या व मानवी वस्तीत होणारा शिरकाव लक्षात घेता वन व वन्यजीव विभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध होणे गरजेचे आहे.
- चौकट
उपाशी बिबट्यांचा धोका अधिक
बिबट्या उपाशी असेल तर तो अधिक हिंस्र बनतो. तो मानवी वस्तीतही अन्नासाठी प्रवेश करू शकतो, असे प्राणीतज्ज्ञ सांगतात. यापूर्वी ठिकठिकाणी जखमी स्थितीत आढळून आलेले काही बिबटे उपाशी होते, अशी माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्यांची देखरेख करण्यास अजूनही टाळाटाळ केली किंवा आपत्ती व्यवस्थापनाबाबत गांभीर्याने विचार केला नाही, तर भविष्यात बिबट्याकडून माणसांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्राणीतज्ज्ञांचे मत आहे.
- चौकट
कऱ्हाड वन विभागाचे क्षेत्र
राखीव क्षेत्र : १२,५८५.५७ हेक्टर
अवर्गित क्षेत्र : १४.६५ हेक्टर
संपादीत क्षेत्र : ५५३.६७ हेक्टर
संरक्षित क्षेत्र : ०.० हेक्टर
एकूण क्षेत्र : १३,१५३.७९ हेक्टर
- चौकट
बिटनिहाय बिबट्याप्रवण क्षेत्र
मलकापूर : ७७०.०४
नांदगाव : ७२८.१९
कोळे : १०३९.४२
कासारशिरंबे : ५८५.११०
तांबवे : ९००.९२
म्हासोली : ८३२.५२
वराडे : १२८४.४००
म्होप्रे : ९१६.१८०
चोरे : ९४८.३२७
(सर्व क्षेत्र हेक्टरमध्ये)
- चौकट
बिबट्याने केलेली
जनावरांची शिकार
२०१३-१४ : २०
२०१४-१५ : १६
२०१५-१६ : ३४
२०१६-१७ : ४४
२०१७-१८ : ७९
२०१८-१९ : ४४
२०२०-२१ : ५३
- चौकट
वन विभागाकडे उपलब्ध साहित्य
लोखंडी पिंजरे - ७
रोप रोल - २
बाजले - १
नायलॉन जाळी - १
फायबर स्टिक - १२
- कोट
‘ट्रँक्युलायझेशन गन’सह इतर आधुनिक साधनांचा बिबट्याच्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’साठी चांगला फायदा होऊ शकतो. मात्र, ही गन व इतर साधने वापरण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची गरज असते. असा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आपल्याकडे उपलब्ध नाही. कऱ्हाड तालुक्यात वराडेत ‘स्पेशल रेस्क्यू सेंटर’चा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून तो अंतिम टप्प्यात आहे. हे सेंटर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल.
- अर्जुन गमरे
वनक्षेत्रपाल, कऱ्हाड
फोटो : २३केआरडी०५
कॅप्शन : गांधीटेकडी-मारूल हवेली येथे काही दिवसांपूर्वी मरणासन्न स्थितीत बिबट्याचा बछडा आढळला होता. हा बछडा अशक्त असल्याने त्याला थेट पकडणे शक्य झाले होते.