सांगलीकडून सिंचन मागणी कमी; कोयना धरणातून विसर्ग कमी केला
By नितीन काळेल | Published: November 3, 2023 02:35 PM2023-11-03T14:35:52+5:302023-11-03T14:36:09+5:30
अपुऱ्या पर्जन्यमानामुळे यंदा धरण भरलेच नाही
सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठीची मागणी कमी झाल्याने काेयना धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यानुसार आता पायथा वीजगृहाचे एक युनीटच सुरू करुन १०५० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कमी पर्जन्यमानामुळे धरण भरले नसल्याने सध्या ८७ टीएमसीवरच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.
सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिलेले आहे. त्यामुळे सध्यस्थितीत अनेक तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला नसलातरी पिण्यासाठी अनेक गावांना टॅंकर सुरू आहेत. यापुढेही टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतच जाणार आहे. तर पावसाअभावी पश्चिम भागातील बहुतांशी धरणे भरली नाहीत. त्यातच कोयना धरणाचीपाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. मात्र, धरणक्षेत्रातच पाऊस कमी झाल्याने ९४ टीएमसीपर्यंतच पाणीसाठा झालेला. सध्या दुष्काळीस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी होत आहे.
मागील आठवड्यात सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार २७ आॅक्टोबरपासून कोयनेच्या पायथा वीजगृहाची दोन युनिट सुरू करुन २१०० क्यूसेक वेगाने सांगलीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मागील आठ दिवस सांगलीसाठी पाणी सोडण्यात येत होते. मात्र, आता सिंचनासाठी मागणी कमी झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे दोनपैकी एक युनीट बंद करण्यात आले आहे. सध्या एकाच युनीटमधून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी कोयना नदीपात्रात जात आहे.
दरम्यान, यावर्षी कोयना धरण भरले नसल्याने पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. त्यामुळे तरतुदीनुसार पाणी सोडावे लागणार आहे. परिणामी सिंचन आणि वीजनिर्मिती पाणी कोट्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
काेयनेवर तीन सिंचन योजना अवलंबून..
कोयना धरणातून सिंचनासाठी पाण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये टेंभू योजना, ताकारी आणि म्हैसाळ या तीन मोठ्या पाणी योजनांचा समावेश आहे. या तिन्ही योजनांचे पाणी सांगली जिल्ह्यासाठी जाते. तसेच टेंभू योजनेचे पाणी सातारा जिल्ह्यासाठीही मिळते. सांगली जिल्ह्यासाठी आतापर्यंत दोनवेळा पाणी सोडण्यात आलेले आहे.