पावसाळ्यापूर्वी पूल होण्याची शक्यता कमीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:37 AM2021-05-16T04:37:30+5:302021-05-16T04:37:30+5:30
पेट्री : गत दोन वर्षांपासून कास धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. धरणाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना या धरणाच्या ...
पेट्री : गत दोन वर्षांपासून कास धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. धरणाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना या धरणाच्या भिंतीवरून मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी पुलाचे काम चालू आहे. सद्यस्थितीत हा पूल प्राथमिक अवस्थेत असून, हा पूल पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता फारच कमी असल्याने बामणोली भागातील सर्व गावे आणि कास धरणाच्या पलीकडील तांबी, जुंगटी परिसरातील गावांची वाहतुकीची कोंडी होणार आहे.
कास धरणाची उंची वाढवण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना सध्या धरणातील पाणी बाहेर पडण्यासाठी लागणाऱ्या सांडव्याचे काम चालू आहे. या सांडव्यावरूनच कास गावालगतच्या पुलाचे काम चालू आहे. सद्यस्थितीत पुलाचे काम पायातच असून, या परिसरात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होते. जेमतेम पंधरा दिवस ते तीन आठवड्यांचा कालावधी उन्हाळ्याचा शिल्लक असून, एवढ्या दिवसात पुलाचे काम पूर्ण होणे अशक्य असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कास धरणाचे कामही संथगतीने सुरू असून, तलाव भरल्यानंतर पाणी वाहून जाणारा जुना ओढा नवीन धरणाच्या भिंतीत गेला आहे. त्यामुळे पहिला पाण्याचा प्रवाह असणाऱ्या जागेवर भराव टाकून रस्ता ओढ्याच्या पलीकडे काढला आहे. त्या ठिकाणीही पाणी जाण्यासाठी भरावाखाली मोऱ्या नसल्याने पाणी पलीकडे कसे जाणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्या कच्चा असणारा मातीचा रस्ता पक्का करण्याचे नियोजन असल्याचे ठेकेदाराकडून सांगितले जात असले तरी पावसापूर्वी ही सर्व कामे न झाल्यास बामणोलीसह कास परिसरातील गावांना वाहतुकीसाठी मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जाते.
कोट...
सध्या धरणाचे काम चालू असलेल्या परिसरातून कच्चा रस्ता वाहतुकीसाठी सुरू असून, थोडासा पाऊस झाला तरी मातीमुळे चिखल तयार होतो. चिखलात गाड्या चालवणे अवघड बनत असून, अपघातांचा धोका वाढला आहे. मागील एक-दोनदा झालेल्या वळीव पावसात वाहने चिखलात फसल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पक्का रस्ता तयार करण्यात यावा.
-विष्णू कीर्दत, माजी अध्यक्ष, कास वनसमिती
कोट
कास धरणावरील रस्ता पक्का न झाल्यास रस्त्यावरील चिखलात भात लागण करण्याची वेळ येणार असून, वेळ हातात आहे तोच येथील कामे तत्काळ करावीत.
-राजेंद्र संकपाळ, माजी सरपंच, बामणोली