जमिनीत ओल कमी; रबीची २२ टक्के पेरणी, शेतकऱ्यांमध्ये चिंता
By नितीन काळेल | Published: October 27, 2023 06:43 PM2023-10-27T18:43:09+5:302023-10-27T18:46:46+5:30
पिकांना पाणी अपुरे पडण्याची भीती कायम
सातारा : जिल्ह्यात अजुनही शेतात खरीपाची पिके असली तरी शेतकऱ्यांनी रबीची पेरणी सुरू केली आहे. आतापर्यंत २२ टक्केच पेरणी झालेली आहे. त्यातच पावसाअभावी जमिनीत ओल कमी असलीतरी शेतकरी पेरणीचे धाडस करु लागले आहेत. पण, भविष्यात पिकांना पाणी पुरणार का याविषयी चिंता कायम आहे.
सातारा जिल्ह्यात खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. यावर्षी खरीपाचे क्षेत्र हे २ लाख ८८ हजार हेक्टरवर होते. पण, सुरुवातीपासून मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने पेरणी ९४ टक्क्यांपर्यंतच झाली. तर उशिरा पेरणीमुळे अजुनही काही भागात पिके रानातच आहेत. अशातच शेतकऱ्यांनी रबी हंगामाची पेरणी सुरू केली आहे. आतापर्यंत २२ टक्के पेर पूर्ण झाली आहे. यामध्ये ज्वारी आणि मकेची पेरणी अधिक आहे.
जिल्ह्यात रबी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख १३ हजार हेक्टर निश्चित करण्यात आलेले आहे. यामध्ये ज्वारीचे १ लाख ३५ हजार ५३१ हेक्टर आहे. तर गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३७ हजार हेक्टरवर, मका १० हजार हेक्टर, हरभरा २७ हजार ७५३ हेक्टर तर करडई, सूर्यफूल, तीळ, जवस या पिकांचे क्षेत्र अत्यल्प आहे. रबीत प्रामुख्याने ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक राहते. यामध्ये माण तालुक्यात सर्वाधिक ३८ हजार ५३४ हेक्टर क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे.
यानंतर खटाव २० हजार २०४ हेक्टर, फलटण १८ हजार ४०६ हेक्टर, कोरेगाव १३ हजार ४५९, सातारा तालुका ९ हजार ५३०, पाटण ९ हजार १७६, वाई ८ हजार ४६८ आणि खंडाळा तालुक्यात ८ हजार ४४१ हेक्टर क्षेत्र राहू शकते. तसेच इतर तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र कमी आहे. आतापर्यंत ४१ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. याचे प्रमाण ३१ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तर आतापर्यंत माण तालुक्यात सुमारे १६ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी पूर्ण झालेली आहे. इतर तालुक्यात पेरणी प्रमाण कमी आहे.
गहू पेरणीला आणखी वेळ आहे. आतापर्यंत एक टक्काही पेरणी झालेली नाही. गहू पेरणीबाबत शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. जमिनीत ओल नसल्यास गव्हाचे क्षेत्र यंदा कमी राहण्याचा अंदाज आहे. गव्हाचे सर्वाधिक क्षेत्र हे फलटण तालुक्यात साडे सहा हजार हेक्टरवर राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर कऱ्हाड तालुक्यात सहा हजार हेक्टर, पाटण तालुका ५ हजार २४५ हेक्टर, सातारा आणि वाई तालुका तीन हजार हेक्टरवर अंदाज आहे. त्याचबरोबर मका पेरणी ३२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. सध्या साडे तीन हजार हेक्टरवर पूर्ण झालेली आहे. हरभऱ्याची दीड टक्का पेरणी झालेली आहे. हरभरा पेरणीसही अजून वेळ आहे.
रबीचे सर्वाधिक क्षेत्र माणमध्ये..
रबीचे जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख १३ हजार हेक्टर आहे. यामधील ४६ हजार ४१८ हेक्टर क्षेत्र माण तालुक्यातील आहे. तर यानंतर फलटण तालुक्यात ३० हजार ८९० हेक्टर, खटाव २९ हजार ८२१, कोरेगाव २१ हजार २६६, पाटण तालुका १७ हजार ८०९ हेक्टर आहे. तर वाई तालुक्यात १४ हजार ६८९ हेक्टर, सातारा १४ हजार ९७०, कऱ्हाड १४ हजार ७३२ हेक्टर, खंडाळा १३ हजार ९५३, जावळी ८ हजार आणि महाबळेश्वर तालुक्यात अवघे ६४५ हेक्टर क्षेत्र आहे.