मिश्रशेतीतून कमी कालावधित अधिक उत्पन्न

By admin | Published: August 26, 2016 10:19 PM2016-08-26T22:19:55+5:302016-08-26T23:16:46+5:30

पद्माळे येथील शेतकऱ्याचा आदर्श; कष्टाने बनविली सुपीक जमीन; शेतीमध्ये बागेचा अनुभव

Less periodic generated yields from the mix | मिश्रशेतीतून कमी कालावधित अधिक उत्पन्न

मिश्रशेतीतून कमी कालावधित अधिक उत्पन्न

Next

एक छोटा शेतकरी अल्पभूधारक, पण त्याच्या शेतात तो मिश्रशेतीच्या माध्यमातून विविध पिकांची लागवड करतो. त्याची विक्रीही स्वत: करतो, त्यामुळे नफाही अधिकाधिक कमावतो, पण त्याचबरोबर शेतीपूरक दुग्ध व्यवसाय करून महिन्याकाठी दहा-बारा हजार कमावतो. कमीत कमी खर्चात अपार क ष्ट करून शेतीतून चांगले उत्पन्न कसे मिळवता येईल, यासाठी धडपडणारा हा तरुण शेतकरी आहे, ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या पद्माळे ता. मिरज गावचा. त्याचे नाव बाजीराव बाळासाहेब कोळी. तो आपल्या शेतकरी बांधवांना संदेश देतो आहे की, ‘‘शेती अल्प आहे, काळजी करू नका. कमीत कमी कालावधित भाजीपाला करा आणि पैसा कमवा.’ वडिलोपार्जीत अल्प जमीन मिळाली असताना त्याने एखादी बाग फुलवावी असे आपले शेत फुलवले आहे. भेंडी, वांगी, दुधी भोपळा, पावटा लावण्यात आला आहे. शेताच्या कडेने तूर, भुईमूग लावला आहे. या भाजीपाल्याच्या उत्पन्नाने चांगले उत्पन्नही घेतले आहे. याद्वारे त्यांनी शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्शही निर्माण केला आहे....
बाजीराव कोळीचे शिक्षण १० वी पर्यंत झाले आहे. वडिलोपार्जित अवघी एक एकर शेती आहे. आई, पत्नी यांच्या मदतीने अपार कष्ट करून ही जमीन त्याने सुपीक बनवली आहे. वडिलांच्या निधनानंतर घरची जबाबदारी त्यावर आली आणि तो पूर्णवेळ शेतीकडे वळला. त्याच्या शेतीत पाऊल टाकताच आपण एखाद्या बंगल्याभोवती असणाऱ्या सुरेख बागेत तर फिरत नाही ना, असे वाटते, इतके सुंदर नियोजन पीक लागवडीत आणि शेतातील स्वच्छतेबाबत केले आहे. त्याने आपल्या शेतात सर्व प्रकारचा भाजीपाला केला आहे. त्यामध्ये भेंडी, वांगी, दुधी भोपळा, पावटा लावण्यात आला आहे.
शेताच्या कडेने तूर, भूईमूग लावला आहे. झेंडूची (मखमल) काही रोपे आहेत. त्याचबरोबर घरातील दुभत्या जनावरांसाठी शेताच्या एका कोपऱ्यात जनावरांसाठी चाराही केला आहे. त्याच्या कुटुंबाने नियोजनपूर्वक भाजीपाला लागवड केली आहे. १० गुंठ्यात भेंडी, १० गुंठ्यात पावटा, १० गुंठ्यात भुईमूग, ५ गुंठ्यामध्ये दुधी भोपळा व चवळी केली आहे. ५ गुंठ्यामध्ये चारा (वैरण) आहे आणि आंतर पिके म्हणून उडीद, मूग, वांगी केली आहेत. मशागतीची कामे घरातील सर्वजण मिळून करतात. त्याचा दिवस सकाळी लवकर सुरू होतो. ताजा भाजीपाला सांगली व आसपासच्या आठवडी बाजारात बाजीराव स्वत: विकतो. अवघ्या दोन-तीन तासात मालाची रोखीने विक्री करून पुन्हा तो आपल्या शेतात कामाला रूजू होतो.
शेतीमाल थेट व्यापारी व दलालांकडे न देता तो ग्राहकाला कमी दरात कसा मिळेल, यासाठी बाजीरावची धडपड सुरू असते. व्यापारी व दलालांचे कमिशन नसल्याने त्याला चांगला भाव मिळत आहे. दोन जनावरे असल्याने ५ गुंठ्यामध्ये लावलेला चारा वैरणीसाठी वापरला जातो. गाय व म्हैशीच्या दुधापासून महिना दहा ते बारा हजार रूपयांचे उत्पन्न मिळते. पण त्यासाठी त्याला प्रचंड कष्ट करावे लागत आहे. जमीन सुपीक बनवणे, चांगल्या रोपवाटिकेतून रोपे आणणे, कीटकनाशकांचा योग्यवेळी वापर, औषध फवारणी, खताची योग्य मात्रा देणे यावर त्याचे बारीक लक्ष असते. शेतीत चांगले उत्पन्न घ्यावयाचे असेल, तर त्यावर मुलाप्रमाणे प्रेम करावे लागते. त्याची सातत्याने काळजी घ्यावी लागते, असे त्याचे मत आहे.
शेती कमी आहे म्हणून नाराज होऊ नका. विविध प्रकारचा सिझनेबल भाजीपाला केल्यास चांगले उत्पन्न मिळून भावही चांगला मिळतो. तरूण शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची मिश्र शेती करावी, असे त्याला वाटते. उसापेक्षाही अधिक फायदा भाजीपाला शेतीत आहे. पण यासाठी वेगळे प्रयोग करण्याची गरज असल्याचेही तो सांगतो. असे प्रयोग करण्यासाठी तरूणांनी पुढाकार घ्यावा, असेही त्याला वाटते.
- गजानन साळुंखे

Web Title: Less periodic generated yields from the mix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.