सातारा जिल्ह्यात पाऊस कमी; धरणात पाण्याची आवक सुरुच, कोयनेतून विसर्ग वाढला
By नितीन काळेल | Published: July 30, 2024 01:07 PM2024-07-30T13:07:58+5:302024-07-30T13:08:26+5:30
उरमोडीतूनही पाणी सोडणार
सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक टिकून आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊ लागला आहे. परिणामी कोयना धरणातून सुमारे ४२ हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. तर उरमोडी धरणातूनही पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर २४ तासांत महाबळेश्वरला १५८ आणि नवजा येथे १०७ मिलिमीटरची नोंद झाली.
जिल्ह्यात मागील आठवड्यात धुवाधार पाऊस झाला. पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी आदी प्रमुख धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून विसर्ग सुरू करावा लागला. सध्या पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणात आवक कायम आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १०७ तर नवजाला ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३ हजार ५८३, नवजा येथे ४ हजार १५४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर महाबळेश्वरला आतापर्यंत ३ हजार ९१३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यातच सकाळच्या सुमारास कोयनेत ३५ हजार ४०१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठाही ८५.३७ टीएमसी झाला होता. तर ८१.११ टक्के धरण भरले आहे.
त्यातच धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारपासून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. दरवाजातील विसर्ग ३० हजारावरुन ४० हजारांपर्यंत नेण्यात आला. तर पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरू असून त्यातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे कोयनेतून ४२ हजार १०० क्यूसेक विसर्ग होत आहे. या विसर्गामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
धोम धरणातूही विसर्ग..
वाई तालुक्यातील धोम धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणातील पाणीसाठा ८२.५८ टक्के झाला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आसरे बोगद्यातून कालव्यात १०० तर वीजगृहातून २०० असा एेकूण ३०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच सायंकाळच्या सुमारासही सांडव्यावरुन विसर्ग करण्याचे नियोजन होते. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
उरमोडीचेही दरवाजे उघडणार..
सातारा तालुक्यातील उरमोडी धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरण पातळी नियंत्रित करण्यासाठी वक्र दरवाजे आणि वीजगृहातून विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे उरमोडी नदीकाठच्या रहिवाशांना पात्रात प्रवेश करु नये, अशी सूचना करण्यात आलेली आहे.