सातारा जिल्ह्यात पावसाची उघडझाप; कोयना धरणात पाण्याची आवक घटली
By नितीन काळेल | Published: August 8, 2023 12:36 PM2023-08-08T12:36:17+5:302023-08-08T12:36:47+5:30
पाणीसाठा अजून ८३ टीएमसीखालीच
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू झाली असलीतरी कोयना धरणातील पाणीसाठा अजूनही ८३ टीएमसीखालीच आहे. त्यामुळे धरण भरण्यासाठी अजून २३ टीएमसी पाण्याची गरज आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरण लवकर भरु शकते. तर २४ तासांत कोयनेला अवघा १२ तर महाबळेश्वरला ५१ मिलीमीटरची नोंद झाली आहे.
पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वरसह कास, बामणोली, तापोळा भागात सवा महिना दमदार पाऊस झाला. यामुळे भात लागणीच्या कामाला वेग आला. तसेच धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडीसह कोयना धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढला. त्यामुळे आज ही धरणे ७० टक्क्यांवर भरलेली आहेत. मात्र, मागील आठ दिवसांपासून पावसाचा जाेर कमी होत गेला. तर तीन दिवसांपासून उघडीप होती. यामुळे धरणातील आवक कमी झाली होती. ही धरणे लवकर भरणार का अशी चिंता होती. पण, उघडीपीनंतर आता पावसाची उघडझाप सुरू झाली आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १२ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे २७ आणि महाबळेश्वरला ५१ मिलीमीटरची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर एक जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे ४४४७ मिलीमीटर पडला. तर कोयनेला ३१२४ आणि महाबळेश्वर येथे ४१२८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. या तीनही ठिकाणी गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे.
कोयना धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास ५ हजार ५४९ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात ८२.४६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.