सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप; कोयनेतील विसर्ग पूर्णत: बंद
By नितीन काळेल | Published: August 9, 2023 12:19 PM2023-08-09T12:19:55+5:302023-08-09T12:21:13+5:30
पाणीसाठा ८३ टीएमसीवर जाईना: महाबळेश्वरला २२ मिलीमीटरची नोंद
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात अत्यल्प पाऊस होत असल्याने कोयना धरणात पाण्याची आवक चार हजार क्यूसेकपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे धरणसाठाही ८३ टीएमसीच्या वर जाईना अशी स्थिती आहे. परिणामी धरण व्यवस्थापनाने कोयना धरणातील विसर्ग बुधवारी सकाळपासून पूर्णत: बंद केला आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरलाच २२ मिलीमीटर झाला आहे.
पश्चिम भागात ४० दिवस दमदार पाऊस झाला. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोलीसह संपूर्ण कांदाटी खोऱ्याला पावसाने झोडपले. पण, चार दिवसांपासून अत्यल्प स्वरुपात पाऊस पडत आहे. यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, अजुनही पश्चिमेकडील धोम, बलकवडी, कोयना, कण्हेर, तारळी, उरमोडीसारखी धरणे पूर्णपणे भरलेली नाहीत. त्यामुळे ही धरणे भरण्यास यंदा उशिर लागणार आहे. कारण, अजुन काही दिवस पावसाची उघडीप राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर सध्यस्थितीत पश्चिमेकडे किरकोळ स्वरुपात पाऊस पडत आहे.
बुधवारी सकाळच्या २४ तासांत कोयनानगरला अवघ्या ९ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर नवजाला १८ आणि महाबळेश्वर येथे २२ मिलीमीटर पाऊस पडला. एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पाऊस नवजा येथे ४४६५ मिलीमीटर झाला. तर कोयनेला ३१३३ आणि महाबळेश्वरला ४१५० मिलीमीटर पडलेला आहे. त्यातच पश्चिम भागात आणि धरणक्षेत्रातही पाऊस कमी आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक एकदम कमी झाली आहे.
बुधवारी सकाळच्या सुमारास कोयनेत ३८२४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८२.६१ टीएमसी होता. मागील तीन दिवसांपासून पाणीसाठा ८२ ते ८३ टीएमसी दरम्यानच आहे. त्यातच आवक घटल्याच्या कारणाने धरण व्यवस्थापनाने सकाळी १० च्या सुमारासच पायथा वीजगृहातील दोन्ही युनीट बंद केली. यामुळे २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग बंद झालेला आहे.