कोयनेत वीस टक्क्यांहून कमी पाणी!
By admin | Published: May 22, 2014 12:02 AM2014-05-22T00:02:09+5:302014-05-22T00:22:22+5:30
वीजनिर्मितीच्या मर्यादा ओलांडल्या : ६७.०५ टीएमसीऐवजी वापरले ७९ टीएमसी पाणी
अरुण पवार, पाटण : राज्याच्या विकासाचा मानबिंदू ठरलेल्या कोयना धरणात २१ मेअखेर केवळ १९.८७ टीएमसी पाणीसाठा उरला आहे. सध्या ‘महाजनको’कडून वीजनिर्मितीसाठी पाण्याची मागणी कमी असली, तरी सांगलीकडील शेती व सिंचनासाठी कोयनेतील पाण्याचा सतत वापर सुरू आहे. पायथा वीजगृहातूनही पाण्याचा वापर थोड्याफार प्रमाणात केला जात आहे. मान्सून दाखल होईपर्यंत कोयना धरण वीज, पाणीपुरवठा, शेती या सर्वांना पुरून उरेल का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. यापैकी ६७.०५ टीएमसी पाणीसाठी वीजनिर्मितीसाठी असून, ३० टीएमसी पाणी पूर्वेकडील म्हणजेच सांगलीकडील शेती, सिंचन व पिण्याच्या पाण्याची गरज भागविते. उर्वरित ५ टीएमसी मृत पाणीसाठा म्हणून राखीव राहतो. कोयना धरणातील विभागणी सामान्यत: वरीलप्रमाणे होते. मागील पावसाळ््यात १०४ टीएमसी पाणीसाठा होऊन कोयना धरण भरले होते. तरीदेखील एप्रिलच्या मध्यात कोयना धरणातील पाणीसाठ्याने झपाट्याने तळ गाठला असल्यामुळे चिंता वाढण्यास सुरुवात झाली. ही चिंता आजही कायम आहे. आजमितीस कोयना धरणात केवळ १९.८७ टीएमसी पाणीसाठा आहे. तरीदेखील सांगलीकडे ६५ दशलक्ष घनमीटर पाणी दिवसाकाठी सोडावे लागत आहे, तर वीजनिर्मितीसाठी पोफळी विद्युत गृहाकडे २१९एमसीएफटी पाणी, चौथ्या टप्प्याकडील वीजनिर्मितीसाठी ३६३ एमसीएफटी पाणी सोडले जात आहे, हे सध्याचे चित्र आहे. ‘महाजनको’ने ६७.०५ टीएमसी पाणीसाठा करारानुसार वापरून झाल्यानंतरही मर्यादा ओलांडत ७९ टीएमसी पाणी वापरण्यापर्यंत मजल मारली. यावर ‘महाजनको’ला जलसंपदा विभागाने एक पत्र पाठवून कोणत्या आधारावर मर्यादा ओलांडून पाणीवापर केला, याचा खुलासा मागविला होता. आता पाऊस वेळेवर येतो का आणि उर्वरित पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरतो का, हे पाहावे लागणार आहे.